Home आपला जिल्हा Breaking News मूलची श्रीराम टॉकीज पंधरा वर्षांनंतर सुरू होणार@शुक्रवारपासून धुरंधर – २ पासून जुन्या...

मूलची श्रीराम टॉकीज पंधरा वर्षांनंतर सुरू होणार@शुक्रवारपासून धुरंधर – २ पासून जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा

1949

पंधरा वर्षांनंतर सुरू होणार मूलची श्रीराम टॉकीज
मूल तब्बल चाळीस वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे येथील चित्रपटगृह विविध कारणांमूळे बंद झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांने नव्या रूपात, आधुनिक सुविधांसह आणि नव्या नावाने पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज होत आहे. येत्या शुक्रवारपासून धुरंधर – २ पासून जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे.
प्रेक्षकांची मागणी लक्षात घेवून स्थानिक दानशुर आणि सेवाभावी व्यक्तीमत्व स्व. नामदेव सावकार गोगीरवार यांनी चिरंजीवाच्या सहकार्याने १० जुलै १९७० मध्यें मूल येथे श्रीराम टॉकीजची निर्मिती केली. जय बजरंग बली या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर १५ मार्च २०१० पर्यंत अनेक हिंदी, मराठी, इंग्रजी नवीन जुने चित्रपट प्रदर्शित करून प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली. दरम्यान विविध कारणांमूळे शहरात लोकप्रिय व मनोरंजनाचे एकमेव साधन असलेली श्रीराम टॉकीज दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने नाईलाजास्तव बंद करणे भाग पडले. यामूळे काही हौसी प्रेक्षक चंद्रपूरच्या वाटेने तर अनेकजन ऑनलाईन अॅपद्वारे चित्रपटांचा आनंद घेवु लागले होते. अलीकडेच शहराच्या मध्यभागी असलेल्या या वास्तुचा उपयोग प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी करावा असा मनोदय पांढरकवडा येथील अब्दुल गिलानी यांनी केला. पांढरकवडा, यवतमाळ आणि हिंगणघाट येथे चित्रपटगृहाचे संचालक अब्दुल गिलानी यांनी पुर्वीच्या श्रीराम टॉकीजचे मालक श्रीकांत गोगीरवार यांच्याशी संपर्क साधला. बंदावस्थेतील चित्रपटगृहाची इमारत वापरण्यास संधी दिली तर चित्रपटगृहाचा कायापालट करण्याचा मानस श्रीकांत गोगीरवार यांच्याकडे व्यक्त केला.
गोगीरवार यांनी होकार दर्शवित भाडेतत्वावर वास्तुचे हस्तांतरण केले. त्यानंतर अब्दुल गिलानी यांनी इमारतीच्या नुतनीकरणास प्रारंभ केला. चार ते पाच महिन्यात गिलानी यांनी इमारतीचा कायापालट करत आता त्या ठिकाणी ए. वन मल्टीप्लेक्स उभे राहत आहे. या मल्टीप्लेक्समध्ये २६० आसन क्षमतेचा उत्तम असा गोल्डन (सेकंड) क्लास आणि ६० आसन क्षमतेच्या बालकनीमध्ये ४० आरामदायी आसन क्षमतेचा प्लॅटीनम क्लास निर्माण करण्यात येत आहे. चित्रपट पाहण्यासाठी नव्या स्वरूपाचा पडदा लावण्यात येत असून ध्वनी प्रणाली कानाला आनंद देणारी असणार आहे. आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक प्रोजेक्शन तंत्रज्ञानाची सुविधा, उत्तम शौचालय, भगिनींसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था आणि बुक माय शो सुरू करून प्रेक्षकांसाठी ऑनलाईन तिकिटची व्यवस्थाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहे.
प्रेक्षकांना मनोरंजनाचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने येथील बंद असलेली टॉकीज सुरू करण्याचा निर्णय घेतला. यात श्रीकांत गोगीरवार यांचे सहयोग मोलाचे आहे. मूल शहरात करीत असलेला टॉकीजचा प्रयोग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. येत्या शुक्रवार (२० मार्च) पासून ए-वन मल्टीप्लेक्स प्रेक्षकांच्या मनोरंजनाकरीता निरंतर सुरू राहणार असून धुरंधर – २ हा पहिला चित्रपट राहणार आहे – अब्दुल गिलानी, संचालक ए-वन मल्टीप्लेक्स मूल
■ ए-वन मल्टिप्लेक्स नावाने येणार नावारूपास ■ जुन्या आठवणींना मिळणार उजाळा