मूल, प्रतिनिधी… शासकीय टोल फ्री क्रमांकावर तक्रार करुन तातडीने कारवाई केली जाते ,मात्र त्यासाठी नागरिकांनी तक्रार करायला पुढे आले पाहिजे आणि सातत्याने या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा जेणेकरून शासनाने तयार केलेल्या या सुरक्षायंत्रणा आपल्याला सहकार्य करतात , परंतू अशा काही यंत्रणा प्रत्यक्ष कार्यरत आहेत यावरच आपला विश्वास नाही परिणामी आपण उघड्या डोळ्यांनी आपली फसवणूक बघून ती सहन करीत असतो,मात्र आता घाबरण्याचे कारण नाही, ग्राहक संरक्षण अधिनियम लागू झाल्यापासून आपल्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत फक्त आपण तक्रार करायला पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन मान.दिलीप फडके, पुणे ,संस्थापक अध्यक्ष तथा राज्य संघटक,जागृत ग्राहक राजा महाराष्ट्र राज्य यांनी केले.
जागृत ग्राहक राजा, नागपूर विदर्भ प्रांत या सामाजिक ग्राहक संघटनेच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक जागृती पंधरवडा (दिनांक ८मार्च ते २४मार्च) समापन सोहळा २०२६चे आयोजन दिनांक २४मार्च रोजी मूल येथील कर्मवीर महाविद्यालयातील भव्य सभागृहात करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला शिक्षण प्रसारक मंडळ मूल चे अध्यक्ष ॲड. अनिल वैरागडे अध्यक्ष स्थानी होते,तर, प्रा.डॉ.विलास अतकरे सहयोगी अधिष्ठाता कृषी महाविद्यालय मूल,प्रा.डाॅ.अनिता वाळके प्राचार्या कर्मवीर महाविद्यालय मूल,दीपक देशपांडे अध्यक्ष जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांत, प्रा.दिनेश बनकर पर्यवेक्षक कर्मवीर महाविद्यालय मूल हे प्रमुख अतिथी म्हणून तर रमेश डांगरे सचिव मूल तालुका शाखा डॉ. आनंदराव कुळे, चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य, सौ.दर्शना देशपांडे जिल्हा कार्यकारिणी सदस्या व रजनी झाडे मूल तालुका शाखा पदाधिकारी आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.
यावेळी स्वामी विवेकानंद आणि ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली आणि कार्यक्रमाची सुरुवात झाली, महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी सुंदर असे स्वागत गीत सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली ती रंगत ग्राहक गीत गायनाने अधिक समृद्ध केली. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश डांगरे सचिव मूल तालुका शाखा जागृत ग्राहक राजा यांनी केले,व ग्राहक जागृती पंधरवडा आयोजनाचा व ग्राहक जागृतीची आवश्यकता व जागृत ग्राहक राजाचे कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली व आपला उद्देश स्पष्ट केलाआणि पाहुण्यांचा परिचय करून दिला.
दिलीप फडके यांनी आपल्या वक्तव्यातून नानाविध उदाहरणे देत हे क्रमांक तक्रारीची कशी दखल घेतात हे उपस्थितांना पटवून देत आपल्यापैकी काहीजण तक्रार करायला पुढे आलात तर बदल हा निश्चितच बघायला मिळेल आणि आज मी पहिल्यांदा विदर्भाच्या भुमीवर आलो असलो तरीही दीपक देशपांडे यांच्या कार्याचा आढावा बघता पुन्हा एकदा इकडे येईन तेव्हा आपल्यातील काही जणांनी या टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करीत न्याय मिळविला आहे हे बघायला ऐकायला आवडेल आणि आमच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचे बघून समाधान होईल असे प्रतिपादन केले.
दीपक देशपांडे यांनी ग्राहक चळवळीचा इतिहास आणि उद्देश,ग्राहक संरक्षण अधिनियम, त्यातील तरतुदी, फसवणूक प्रकार आणि तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याची गरज त्यासाठी उपलब्ध सोयीसुविधा आणि न्यायव्यवस्था यांबाबत सविस्तर आढावा घेतला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात ॲड.अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल यांनी , जागृत ग्राहक राजा च्या कार्यामुळे समाजात जनजागृती चे महत्वपूर्ण कार्य सुरू असल्याचे व या चमूच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी ग्राहक म्हणून आपले अधिकार जाणून घेणे आणि आपली फसगत होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता प्रतिपादन करताना सद्यस्थितीत किती सहजपणे आपण फसवले जात आहोत हे याआधी वक्त्यांनी पटवून दिले असल्याने फसवणूक प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले व न्याय प्रक्रिया सुदृढ असल्याचे मत व्यक्त केले.
डॉ अतकरे सहयोगी अधिष्ठाता कषी महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थी दशेत आपल्या अधिकारांची जाणीव करून देणे आणि आपल्या अधिकारांसाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम जागृत ग्राहक राजा या संघटनेच्या वतीने सातत्याने सुरू असल्याचे अधोरेखित करताना दिवसेंदिवस फसवणूक प्रकार वाढत आहेत त्यामुळे त्यांचे कार्य आणि समाजप्रबोधन ही आवश्यक बाब ठरत असून अशा कार्यक्रमाचे आयोजन करुन जागृत ग्राहक राजा ची चमू एक नवीन दिशा समाजाला देत असल्याचे प्रतिपादन करताना या कार्याची दखल घेत विद्यार्थ्यांनी आपली फसवणूक होणार नाही यासाठी सजगतेने व्यवहार करण्याची व तक्रारीसाठी पुढे येण्याची आवश्यकता व्यक्त केली.
डॉ.अनिता वाळके प्राचार्या कर्मवीर महाविद्यालय मूल यांनी दीपक देशपांडे यांच्या सततच्या संघर्ष आणि सातत्यपूर्ण कार्याची मनापासून स्तुती करताना जागृत ग्राहक राजा चे वतीने सुरू असलेले हे ग्राहक जागृतीचे कार्य अतिशय प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असून आमच्या विद्यार्थ्यांना आपली फसवणूक होण्यापूर्वी सजगतेने व्यवहार करण्याची प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहे आणि अशा कार्यक्रमातून जनतेला फसवणुकीपासून आपला बचाव करण्याचा एक सहजसुलभ मार्ग दाखवित असल्याचे स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांनी आपल्या अधिकारांची माहिती मिळवून आपली तसेच आपल्या कुटुंबाची फसवणूक होणार नाही यासाठी सजगतेने व्यवहार करण्याची सुचनाही दिली आणि कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता सुरू असलेल्या जागृत ग्राहक राजा च्या कार्याचे कौतुक केले व सुयश चिंतीले.
या कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी स्मृती ग्राहक मित्र पुरस्काराने, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा चन्ने सर , यांनी केले, राष्ट्रगीत गायनाने ह्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. जवळपास चार तास चाललेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकारी व ग्राहक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि सभागृह खचाखच भरले होते.








