मूल : बेंबाळ पोलिस चौकी हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा आरोपी महाराज उर्फ निशिगंध जपान उराडे (३५) हा अडीच महिन्यांपासून फरार आहे. अल्पवयीन पीडित मुलीचे आई-वडील घरी नसल्याची संधी साधून आरोपीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. मुलीने आरडाओरड करताच आरोपी फरार झाला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी २९ जून २०२५ रोजी गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यापासून आरोपी अजुनही फरारच आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांना विचारले असता शोध सुरू असून आरोपी मिळाल्यास अटक करू, अशी माहिती दिली.






