चंद्रपूर जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांना एपीआय पदावर पदोन्नती प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाच्या पदोन्नती धोरणानुसार पोलीस विभागातील सहायक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदांच्या रिक्त जागा भरण्याच्या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्यातील पाच पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळाला आहे. विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशी व पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांच्या मान्यतेनंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शासनाच्या ७ मे २०२१ च्या निर्णयानुसार सेवाज्येष्ठतेच्या निकषावर पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार सन २०२४-२५ साठी विभागीय पदोन्नती समितीने पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची तयार केली होती. या प्रक्रियेत यापूर्वी ३४१ पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर निवडसूचीतील मोहोरबंद प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्यात आले. पुनर्विलोकनानंतर आणखी ४८८ पात्र पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नतीसाठी मंजुरी देण्यात आली असून, महसूल संवर्ग वाटप नियमांनुसार त्यांची पदस्थापना निश्चित करण्यात आली आहे. या पदोन्नती यादीत चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभिषेक प्रभाकर जंगमवार, वर्षा तुकाराम नैताम, दीपक भाऊराव ठाकरे, सचिन विनायक मुसळे आणि मनोज विलासराव वासाडे या पाच पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. संबंधित अधिकाऱ्यांना कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून सहायक पोलीस निरीक्षक पदाचे अधिकार व जबाबदाऱ्या लागू होणार आहेत. या पदोन्नतीमुळे चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या मनोबलात वाढ होणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Home आपला जिल्हा Breaking News मूल पोलीस स्टेशनच्या नैताम मॅडम पोलीस उपनिरीक्षक(PSI)पदावरून, सहायक पोलीस निरीक्षक(API) या पदावर...







