Home आपला जिल्हा Breaking News पालकांना खूशखबर! आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी अर्जाची मुदतवाढ

पालकांना खूशखबर! आरटीई अंतर्गत २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी अर्जाची मुदतवाढ

132

मुंबई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशाची संधी देणाऱ्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायद्याअंतर्गत २५ टक्के राखीव प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. आता पालकांना १८ मार्च २०२६ पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिली आहे.

प्रवेशाला मुदतवाढ, पालकांना खूशखबर : राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागानं यासंदर्भात सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी तसेच महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना पत्र पाठवून ही माहिती कळवली आहे. त्यानुसार २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२६ या कालावधीत सुरू होती. मात्र अनेक पालकांकडून अर्ज भरण्यासाठी अधिक वेळ देण्याची मागणी होत असल्यानं ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरटीईनुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेश : आरटीईनुसार २५ टक्के ऑनलाईन प्रवेशासाठी शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अंतर्गत खासगी स्वयंअर्थसहाय्यित व विना-अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के जागा दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण घेण्याची संधी मिळते. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च शासनाकडून शाळांना परतफेड स्वरूपात दिला जातो.

अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज : राज्य सरकारनं १२ फेब्रुवारी २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार यंदाची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं राबवली जात आहे. पालकांना अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागतो. अर्ज करताना विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, राहत्या पत्त्याचे तपशील, उत्पन्न प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रं अपलोड करणं आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संगणकीय लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाते.