कृषी महाविद्यालय मूल अंतर्गत शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची छत्तीसवी बैठक दिनांक २७/०९/२०२५ गुरुवार रोजी सायंकाळी ६.०० वाजता मौजा मरेगाव* ता. मूल जि. चंद्रपूर येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या प्रसंगी मरेगाव येथील सरपंच ज्योत्सना पेन्दोर, जागृत ग्राहक राजा चे सदस्य व श्री.पुंडलिक जवादे (पोलीस पाटील), इतर शेतकरी बांधव तसेच कृषि महाविद्यालय, मुल येथील डॉ. शेलेंद्र कडू (सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या) व विषयतज्ञ मंडळी उपस्थित होती. या बैठकीत मुख्यतेने रब्बी धान लागवड आणि भातपड क्षेत्रात तेलबिया व फळझाडांची लागवड आर्थिक विकासाचा मार्ग विषयावर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, मूल यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व शेतकऱ्यांनी शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी, रब्बी हंगामात घ्यावयाची काळजी याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये शेतकऱ्यांनी शेतीची योग्य मशागत करणे, माती परीक्षण करणे, योग्य वाणाची निवड करणे, पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक, उद्यानविद्या यांनी हवामानातील बदलत्या परिस्थितीत पारंपारिक पिक असललेल्या धान पिकासोबत शेतकऱ्यांनी भविष्यातील शाश्वत उत्पादनाचे साधन म्हणून धानाच्या बांध्यावर फणस पिकाची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले. तसेच जांभूळ, पेरू, सीताफळ, शेवगा पिक लागवड तंत्रज्ञान व त्यांचे फायदे यावर सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. विशाखा डोंगरे, मृदाविज्ञान विषयतज्ञ यांनी सेंद्रिय खताचा वापर रासायनिक खतांसोबत करणे, सेंद्रिय वापरामुळे जमीनीचा पोत सुधारतो व सुक्ष्मजीवांच्या वाढीसाठी उपयुक्त असते. रासायनिक खतांचावापर विद्यापिठाच्या शिफारसीनुसार करावा आणि नत्र पिकास विभागून वाढीच्या अवस्थेनुसार द्यावे. कमीत कमी तीन वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करावे यावर मार्गदर्शन केले. कृषिविद्या विषयतज्ञ देवानंद कुसुंबे यांनी धान उगवणक्षमता चाचणी कशी करावी, पेरणीआधी तीन टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया प्रक्रिया, धान पिकाची निरोगी रोपवाटिका कशी तयार करावी तसेच रब्बी धानातील तणांचे नियंत्रण कसे करावे यावर मार्गदर्शन केले. कृषिविद्या विषयतज्ञ डॉ. स्वप्निल ठाकरे यांनी धान काढणीनंतर उपलब्ध असलेल्या ओलाव्याच्या फायदा घेण्यासाठी रब्बी हंगामात जवस व मोहरी पिकांची लागवड करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. कारण ही पिके जमिनीतील उपलब्ध ओलाव्यावर व इतर पिकांच्या तुलनेने कमी पाण्यावरही (कमी सिंचनातही) घेतले जाऊ शकते असे सुचविले.
डॉ. प्रविणा बरडे, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ यांनी पेरणीपूर्वी जमीन व बियाण्याची काळजी कशाप्रकारे घ्यायची यावर प्रकाश टाकला, यामध्ये रोगांचा संसर्ग व मूळ नष्ट करण्यासाठी कसा महत्वाचा आहे हे सांगितले. चार ग्रॅम ट्रायकोडेर्मा प्रती किलो बियाण्यास बिजप्रक्रियेसाठी व जमिनीसाठी २ ते २.५ किलो ट्रायकोडेर्मा चांगल्या व कुजलेल्या २५-३० किलो शेणखतामध्ये मिसळून टाकण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच जैविक बुरशीनाशके व खते वापरण्यासाठी भर दिला.
सदर कार्यक्रमास एकुण २६ शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमचे सूत्रसंचालन कृषिविद्या विषयतज्ञ, श्री. देवानंद कुसुंबे यांनी केले व उपस्थितांचे आभार मृदाविज्ञान विषयतज्ञ, डॉ अक्षय इंगोले यांनी मानले.






