Home आपला जिल्हा Breaking News कर्मवीर महाविद्यालय मूल येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

कर्मवीर महाविद्यालय मूल येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

79

कर्मवीर महाविद्यालय मूल व राष्ट्रीय सेवा योजना+2 यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता वाळके मॅडम यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.दिनेश बनकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अनिता वाळके मॅडम यांनी संविधान दिनाचे महत्व सांगत उद्देशपत्रिकेचे वाचन केले तसेच सर्वांना संविधानाची शपथ देत राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही मूल्ये, समानता व बंधुता यांची जाणीव करून दिली.

त्यांनी आपल्या मनोगतात संविधान रचनेची प्रक्रिया, बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान, तसेच विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याची गरज यावर विशेष प्रकाश टाकला.

शैक्षणिक संस्थांचे मूलभूत कार्य म्हणजे सज्ञान, उत्तरदायी व मूल्याधिष्ठित नागरिक घडवणे असून अशा दिवसांद्वारे देशभक्तीची भावना दृढ होत असल्याचे त्या म्हणाल्या.

प्रमुख अतिथी पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर सर यांनी संविधानाचा ऐतिहासिक प्रवास, त्यातील प्रमुख वैशिष्ट्ये – जसे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, संघीय रचना व सामाजिक न्याय – याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

संविधान ही केवळ कायद्यांची जंत्री नसून देशाचे मार्गदर्शक तत्त्व आहे, आणि प्रत्येकाने त्याचे अध्ययन करून ते दैनंदिन जीवनात पाळणे ही राष्ट्रीय जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्राध्यापकांनीही संविधानाबद्दलचे आपले विचार व्यक्त केले.

यामध्ये प्रा. सागर मासीरकर, प्रा. अनिल शेलेकर, प्रा. सिकंदर लेनगुरे, प्रा. निरंजन चन्ने, प्रा. निखिल दहिवले, प्रा.डॉ. गणेश आगलावे, प्रा. डॉ. अतुल पारखी, प्रा. समीर अलुरवार व प्रा. अमित धोंडरे ,अरूणा उमरे मॅडम यांनी संविधानातील मूल्यांची आजच्या समाजातील आवश्यकता, विद्यार्थ्यांची भूमिका, आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज यावर आपली मते मांडली.महाविद्यालयातील विद्यार्थीनी कुमारी प्राजु गावतुरे, कुमारी पूर्वशी कुंटावार, आणि कुमारी पूनम मुनगंटीवार यांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांमुळे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, स्वातंत्र्य व संधी याबद्दल मिळणाऱ्या प्रेरणेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी संविधानाचे भान ठेवून जबाबदारीने वागण्याची गरज नमूद केली.

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना (NSS +2) कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल  बोधे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होऊन संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.