Home आपला जिल्हा Breaking News मूल नगर परिषद कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी मोठी गर्दी @उमेदवारांना कर भरणे गरजेचे

मूल नगर परिषद कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी मोठी गर्दी @उमेदवारांना कर भरणे गरजेचे

58

कर भरण्यासाठी इच्छुकांची धावपळ; पालिकांना लागणार ‘जॅकपॉट’ थकबाकी भरताना ‘वन टाइम क्लिअरन्स’ : उमेदवारांना कर भरणे गरजेचे
मूल नगर परिषदांमध्ये नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारांचा तसेच सूचक आणि अनुमोदकांचा कोणताही कर थकीत नसावा, ही अट असल्यामुळे नगर परिषद कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.
निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच नागरिकांनी स्वतःची कर थकबाकी फेडण्यास प्राधान्य दिल्याचे दिसून येते. नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करण्यापूर्वी मागील तीन ते चार वर्षांची थकबाकी देखील भरली असल्याने यंदा नगर परिषदांच्या महसूल वसुलीत विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. सूचक, अनुमोदकांनाही कर भरावा लागणार
उमेदवारी प्रक्रियेत राजकीय पक्षाकडून नामांकन देताना एक सूचक लागतो, तर अपक्ष उमेदवारांना पाच सूचक आवश्यक असतात. निवडणूक नियमांनुसार हे सर्व सूचक व अनुमोदक थकबाकीदार नसावेत. यामुळे अनेक उमेदवारांनी आपल्या सूचकांच्या आणि अनुमोदकांच्या थकबाकीची रक्कम स्वतः भरल्याचे दिसून येते. त्यामुळे उमेदवारांकडून सध्या “थकबाकी फेड मोहीम सुरू असल्याचे चित्र आहे.
उमेदवारीसाठी १० ते १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
१० नोव्हेंबरपासून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्याअगोदर कर निरंक असणे आवश्यक असल्याने नगर परिषद कार्यालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिक आणि उमेदवारांकडून कर भरण्याची लगबग सुरू आहे. निवडणुकीच्या या प्रक्रियेमुळे पालिकांच्या महसुलात मोठी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
निवडणुकीमुळे वाढली कर वसुली
निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे गेल्या काही महिन्यांपासून अपूर्ण राहिलेली मालमत्ता कर व पाणीपट्टीची रक्कम वसूल होऊन पालिकांच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर निधी जमा होत आहे. काही उमेदवारांकडे मागील अनेक वर्षांचा कर थकबाकी असल्याने त्यांनी थकबाकी भरताना ‘वन टाइम क्लिअरन्स’ करून घेतली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने अशा प्रकारे थकीत रकमेची वसुली होणार असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना चालना मिळेल, असे नगर परिषद स्रोतांकडून सांगितले जात आहे. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांकडून पराकाष्ठा!
निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत तारीख जाहीर होताच राजकीय वातावरणात रंग चढत आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या कामगिरीनंतर आता आमची वेळ आली आहे, असे म्हणत अनेक इच्छुकांनी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्नांची शर्यत सुरू केली आहे. नेत्यांकडे भेटीगाठी, चर्चा,समन्वय बैठका आणि गुप्त राजकीय चाचपणीला उधाण आले आहे.