नवीन उमेदवारांना संधी देण्यास पक्षांची ‘नो रिस्क’ भूमिका
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. नगराध्यक्ष पदासाठी कोणाच्याही नावाची घोषणा अद्याप झालेली नसली तरी इच्छुकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. नगराध्यक्ष पद न मिळालं तरी ‘नगरसेवकाची तरी तिकीट द्या’ अशा मागणीचा प्रस्ताव देऊन गळ स्वयंघोषित नेत्यांकडून घातली जात आहे.
नगरपालिका निवडणुकीची तारीख नुकतीच जाहीर झाली आहे. अशात पक्षीय गोटात तिकिटासाठी धावपळ सुरु असून जुन्या नगरसेवकांबरोबरच नव्या चेहऱ्यांनी ही आपले राजकीय गणित मांडायला सुरुवात केली आहे. मात्र, गेल्या काही निवडणुकांचा अनुभव लक्षात घेता राजकीय पक्ष नवीन उमेदवारांवर धोका पत्करण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे बहुतेक पक्षांची भूमिका ‘नो रिस्क’ अशीच राहिली आहे. जुने, कार्यकर्त्यांशी जोडलेले आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेलेच उमेदवार पुन्हा मैदानात उतरतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत सर्व प्रमुख पक्षांनी मौनच बाळगले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, सह सर्वच पक्षांकडून अजून कोणतेही अधिकृत संकेत मिळालेले नाहीत. त्यामुळे शहरात ‘कोण होईल नगराध्यक्षपदाचा चेहरा?’ याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
स्वयंघोषित नेत्यांकडून मात्र तयारी जोरात सुरु आहे. काही ठिकाणी प्रचार साहित्याची छपाई, कार्यकर्त्यांची बैठक, मतदारसंघनिहाय भेटीगाठी अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘नगराध्यक्ष नाही तरी नगरसेवक होऊ ‘या’ या घोषवाक्याखाली आता अनेकांनी आपले राजकीय समीकरण पुन्हा मांडायला सुरुवात केली आहे. वर्षांनंतर होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत दीर्घ प्रतीक्षेत असलेले इच्छुक उमेदवार गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ही या निवडणुकीत उभे राहण्यासाठी आपली दावेदारी करत आहे.






