Home आपला जिल्हा Breaking News मूल तालुक्यातील@रोजगार उपलब्ध असतानाही रोजगारापासून मजूर वंचितच

मूल तालुक्यातील@रोजगार उपलब्ध असतानाही रोजगारापासून मजूर वंचितच

106

वाघाच्या दहशतीने तेंदूपत्ता संकलनाकडे नागरिकांची पाठ
रोजगार उपलब्ध असतानाही रोजगारापासून मजूर वंचितच
मूल : तालुक्यात तेंदुपत्ता संकलनाला सुरुवात झाली आहे. मात्र, मागील वर्षभरात मूल तालुक्यात मानव- वन्यप्राणी संघर्ष होऊन वाघाच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला. जंगलव्याप्त परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला असल्याने तालुक्यातील नागरिकांना वाघाच्या दहशतीत जीवन जगावे लागत आहे. परिणामी नागरिकांनी तेंदुपत्ता संकलनाकडे पाठ फिरवली असून तेंदुपत्ता संकलनाचा रोजगार उपलब्ध असतानाही वाघाच्या दहशतीने रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे.
मूल तालुक्यातील अनेक गावे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून आहेत. त्यामुळे या गावातील सभोवताल घनदाट जंगल असून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा वावर आहे. दरम्यान, मागील वर्षात मानव-वन्यप्राणी संघर्ष होऊन वाघाच्या हल्ल्यात अनेक शेतकरी, गुराखी, महिलांचा बळी गेला. घरातील कर्ता कुटुंब प्रमुख गेल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत.
मूल तालुक्यात धानपीक झाल्यावर : रोजगाराचे कुठलेही साधन नाही. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत नागरिक तेंदुपत्ता संकलनाच्या रोजगारावर अवलंबून असतात. तेंदुपत्ता संकलन जवळपास महिनाभर चालत असतो. यातून मिळणाऱ्या मिळकतीने कुटुंबाची घडी बसण्यास मोठा हातभार लागतो. तर, शेतीच्या हंगामासाठी लागणाऱ्या खर्चाला, गरीब कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नालाही मदत होते.
त्यामुळे नागरिक तेंदुपत्ता संकलनाची चातकासारखी वाट बघत असतात. मात्र, होणाऱ्या मानव- वण्यप्राणी संघर्षाच्या भीतीने व वाघाच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून तेंदूपत्ता संकलन सुरू झाले
असले तरी नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.
त्यामुळे नागरिकांना तेंदुपत्ता संकलनापासून मिळणाऱ्या
रोजगारावर संक्रात आली असून रोजगार उपलब्ध असतानाही नागरिकांना रोजगाराला मुकावे लागत आहे.
२० लाख पुडक्यांचे टार्गेट, पण कुणीही जाईना !
■ मूल तालुक्यातील जानाळा युनिट अंतर्गत जानाळा, आगडी, कांतापेठ, टोलेवाही, चिरोली, खालवसपेठ, नलेश्वर, सुशी, दाबगाव या गावांसाठी जवळपास २० लाख के संकलनाचे टार्गेट आहे.
■ मात्र, वाघाच्या दहशतीने नागरिकांनी तेंदुपत्ता संकलनाकाडे पाठ फिरवली असून तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगलात जाणे नागरिकांनी टाळले आहे.
शेतीची कामे झाल्यावर रोजगाराचे कुठलेही साधन उपलब्ध नाही. उन्हाळ्यात तेंदुपत्ता संकलनाचा रोजगार असतो. तेंदुपत्ता संकलनावरील मिळणाऱ्या मोबदल्या व्यतिरिक्त शासनाने बोनस जाहीर केला असल्याने हा रोजगार परवडण्यासारखा आहे. मात्र, वाघाच्या दहशतीमुळे तेंदुपत्ता संकलनाकरिता जंगलात जाण्यासाठी भीती वाटते. परिणामी यावर्षी आम्हाला रोजगारापासून दूर राहावे लागले आहे.
-विलास आळे, ग्रामस्थ जानाळा
तेंदुपत्ता संकलनाला शुक्रवारपासून सुरुवात • झाली आहे. मात्र हिंस्र वन्यप्राण्यांच्या भीतीने काही गावातील नागरिकांनी तेंदुपत्ता संकलनासाठी जाणे टाळले असून तेंदुपत्ता संकलनाला नागरिकांचा अल्पसा प्रतिसाद आहे. त्यामुळे असलेले टार्गेट पूर्ण होण्याची शाश्वती धूसर आहे.
– राकेश गुरनुले, वनरक्षक जानाळा.