देशातील लसीकरणाचा वेग दुप्पट करणार; भारतातील निम्म्या लसी थेट राज्यांना मिळणार : पंतप्रधान

29

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसंच दररोज देशात रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांसी संवाद साधला. कठीण परिस्थितीतही आपण धैर्य सोडू नये. आपण योग्य प्रयत्न केले तर आपण नक्कीच विजय मिळवू शकतो. हेच डोळ्यासमोर ठेवून देश आज दिवसरात्र काम करतोय. गेल्या काही दिवसांत घेतलेले निर्णय परिस्थिती सुधारेल, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. ऑक्सिजनची कमतरता भासत आहे त्यासाठीही मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. ऑक्सिजनची निर्मिती करण्यावरही प्रयत्न केले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यासाठी प्रत्येक शक्य ते प्रयत्न केले जात आहे. यावेळी कोरोनाच्या केसेस वाढल्या वाढल्याच देशातील फार्मा कंपन्यांनी औषध कंपन्यांनी उत्पादन वाढवलं आहे. औषध कंपन्या अजूनही उत्पादन वाढवत आहेत. अनेक कंपन्यांची मदत घेतली जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

आपल्याकडे मोठं फार्मा क्षेत्र आहे जे मोठ्या प्रमाणात औषधं निर्माण करत आहेत. बेड्सची संख्याही वाढवण्याचं काम सुरू आहे. यापूर्वीची कोरोना लाट येतानाच आपल्या वैज्ञानिकांनी लसीवर काम सुरू केलं होतं. आज जगातील सर्वात स्वस्त लस आपल्याकडे आहे. लसींना मान्यता देण्यासह अन्य बाबीही फास्ट ट्रॅकवर सुरू आहे. दोन भारतीय लसींच्या माध्यमातूनच आपण मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू शकलो, असंही मोदींनी नमूद केलं. जगात सर्वात जलद गतीनं आपण लसीकरण मोहीम राबवली आहे. आपल्या देशातील मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचारी, फ्रन्ट लाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा लाभ घेता आलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पहिल्याप्रमाणेच सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लसीकरण मोहीम सुरूच राहणार. देशात लसीकरणाचा वेगही वाढवण्यात येणार आहे. आमचा सर्वाचा प्रयत्न जीवन वाचवण्यासाठी आहे. आर्थिक चक्र आणि उपजीविका कमीतकमी प्रभावित राहाव्या याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याकडे व्यवस्था नव्हती. परंतु आता ती आहे, असं त्यांनी नमूद केलं.

“देशात कोरोनाची लाट पुन्हा एकदा वादळ बनून आलं आहे. जो त्रास तुम्ही सहन केला किंवा सहन करताय त्याची मला जाणीव आहे. ज्यांनी आपल्या लोकांना गमावलंय त्यांच्याप्रती मला दु:ख आहे. हे आव्हान मोठं आहे. परंतु आपल्याला एकत्र मिळून त्याला पार करायचं आहे,” असंही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी कोरोनाशी सामना करण्यात मदत करत असलेल्यांचे आभार मानले.

१ मे पासून मोठ्या प्रमाणात लसीकरण

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत असून सरकारकडूनही यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसंच आता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीमही हाती घेण्यात आली आहे. १ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार असून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी मंगळवारी लस उत्पादकांशीही संवाद साधला. गेल्या दोन दिवसांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेली ही तिसरी बैठक होती.

यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतल्या होत्या बैठका

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोनाशी निगडीत विषयांवर २ महत्त्वाच्या बैठका घेतल्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील मोठ्या डॉक्टरांशीही संवाद साधला होता. त्यानंतर देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्राकडूनही आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे.