९७ हजारांचे प्रतिबंधित ‘एचटीबीटी’ कापूस बियाणे जप्त
मूल : कृषी विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे कोरंबी येथे धडक कारवाई करत, विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला ९७ हजार ८३० रुपयांचा अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त केला आहे. त्र्यंबक चुधरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कोरंबी येथील त्र्यंबक चुधरी यांच्या गोदामात शासनाची मान्यता नसलेल्या प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची बेकायदेशीर साठवणूक करून ते शेतकऱ्यांना विक्री केली जात होती. जिल्हा भरारी पथकाने शासकीय पंचांसमक्ष छापा टाकला. या छाप्यात ९७ हजार ८३० रुपये किमतीची १०७ पाकिटे संशयित बियाणे जप्त करण्यात आली.
कृषी पथकाने या बियाण्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. जप्त साठा मूल पोलिस ठाण्यात सुपूर्द करून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात मोहीम अधिकारी लकेश कटरे, श्रावण बोधे, सुनील कारडवार, मनीषा राजनहिरे आदींनी केली.








