जागतिक पर्यावरण दिन
आज दिनांक 5 जून 2026 रोज शुक्रवारला विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय, बेंबळ येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे उचित्य साधून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. 
आपल्या संस्कृतीने नदीला पावित्र्य, पृथ्वीला मातृत्त्व, निसर्गाला पितृत्त्व, डोंगरदNयांना बंधुत्त्व बहाल करून मानवाची नाळ निसर्गाशी जोडलेली आहे. मातीतून जन्माला येत, मातीतच आपण मिसळणार आहोत याची जाणीव दिली आहे. त्यामुळे पर्यावरणाचा विचार आपल्या मनात असतोच, फक्त त्याला खतपाणी
घालण्यासाठी आजच्या दिवसाचे औचित्य !
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज तर अशा विशेष दिनाची वाट न पाहता वृक्षवल्लींशी थेट घरोबा करतात. शेवटी तेही संसारी माणूसच. संसारी व्यक्ती नातीगोती, प्रपंच, गणगोत याशिवाय राहू शकत नाही. परंतु संतांचा संसारही वेगळा. विषयासक्त नसलेला. म्हणून तर ते निसर्गाशी सोयरिक जोडून म्हणत आहेत,
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,
पक्षीही सुस्वरे आळविती ।
नातेवाईक म्हटले की रुसवे फुगवे, कुरबुरी, राग मत्सर या गोष्टी आल्याच. परंतु तुकोबा रायांचे नातेवाईक सुस्वरात गातात, बोलतात, आनंदाने जगतात व दुसऱ्यांनाही आनंदाने जगायला शिकवतात.








