Home आपला जिल्हा Breaking News मुल मध्ये दोन भरमार बंदुका जप्त@अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसाचा छापा

मुल मध्ये दोन भरमार बंदुका जप्त@अवैध शस्त्रसाठ्यावर पोलिसाचा छापा

497

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध शस्त्रधारकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) चंद्रपूर आणि मुल पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने मोठी कारवाई करत एका युवकाच्या ताब्यातून दोन विनापरवाना भरमार बंदुका जप्त केल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मुल शहरात गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. ताडाळा रोड परिसरातील वॉर्ड क्रमांक १७ येथे राहणारा संजुसिंग संतोषसिंग पटवा (२४) याने आपल्या घरात विनापरवाना गावठी बनावटीच्या भरमार बंदुका लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.माहितीची खातरजमा करून स्थानिक गुन्हे शाखा आणि मुल पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपीच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता दोन गावठी बनावटीच्या भरमार बंदुका आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या या अग्निशस्त्रांची अंदाजे किंमत २० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी दोन्ही बंदुका ताब्यात घेतल्या.
चौकशीदरम्यान आरोपीकडे या शस्त्रांचा कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मुल पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३ व २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आणि मुलचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, विनोद भुरले, रूपेश कुंभारे तसेच पोलिस कर्मचारी धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, सुरेंद्र महतो, सुमित बरडे, प्रफुल्ल गारघाटे, मिलिंद टेकाम, नरेश कोडापे, संदीप चौधरी आणि पूजा मेश्राम यांनी केले.
अवैध शस्त्रसाठ्या विरोधातील या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

भरमार बंदूक म्हणजे काय?
आधुनिक बंदुकांप्रमाणे यामध्ये तयार काडतूस (Bullet / Cartridge) मागून लोड केले जात नाही. या बंदुकीच्या नळीच्या पुढच्या भागातून (Muzzle) दारूगोळा भरला जातो, म्हणून याला ‘भरमार’ म्हणतात.
या बंदुकीची गोळीबार करण्याची पद्धत खालीलप्रमाणे असते: १. सर्वप्रथम बंदुकीच्या नळीत पुढून काळी दारू (Gunpowder) टाकली जाते. २. त्यानंतर ती दारू एका लोखंडी सळईने ( Ramrod) आतमध्ये घट्ट दाबून किंवा ठासून बसवली जाते (म्हणून याला ठासणीची बंदूक म्हणतात). ३. वरून लोखंडी छर्रे, काचांचे तुकडे किंवा शिशाची गोळी टाकली जाते. ४. बंदुकीच्या मागच्या बाजूला असलेल्या टोपीवर (Percussion cap) जेव्हा ट्रिगर दाबून हातोडा आदळतो, तेव्हा ठिणगी पडून आतल्या दारूचा स्फोट होतो आणि छर्रे वेगाने बाहेर फेकले जातात.
याचा वापर कशासाठी केला जातो?
१. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण: ग्रामीण आणि विशेषतः जंगलव्याप्त भागात शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे रानडुक्कर, हरिण किंवा इतर वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी या बंदुकीचा वापर करतात. अनेकदा प्राण्यांना फक्त घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार करण्यासाठी याचा वापर केला जातो.
२. शिकार करण्यासाठी (अवैध): दुर्गम किंवा वनक्षेत्राच्या भागात अनेकदा रानडुक्कर, चितळ, सांबर किंवा पक्षांची अवैध शिकार करण्यासाठी या बंदुकीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यामध्ये छर्रे वापरले जात असल्याने एकाच वेळी मोठ्या क्षेत्रावर मारा होतो, ज्यामुळे लहान-मोठे प्राणी सहज जखमी होतात किंवा मरतात.
३. स्वसंरक्षण: काही अतिदुर्गम भागात किंवा जंगली श्वापदांची भीती असलेल्या ठिकाणी स्थानिक लोक स्वसंरक्षणासाठी (परवान्यासह किंवा विनापरवाना) ही बंदूक जवळ बाळगतात.