प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने निर्णायक पाऊल उचलत अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक केली. या कारवाईत तीन स्वतंत्र घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे १७ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमोल इलमकर रा. दुर्गापूर असे आरोपीचे नाव आहे.
मुल येथील प्रकाश नारायण चिप्पावार यांचे घर फोडून २ लाख २७ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याची घटना घडली होती. त्याचे
समांतर तपास करत असताना तपासादरम्यान आरोपी अमोल इलमकर रा. दुर्गापूर याच्याबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. तांत्रिक तपास आणि कसून चौकशीत आरोपीने गुन्ह्यांची कबुली दिली.आरोपीकडून १०५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.
याशिवाय घुग्गुस पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील चांदीच्या दागिन्यांपासून तयार केलेली १ किलो ४११ ग्रॅम वजनाची लगडही आरोपीच्या सांगण्यावरून एका महिलेकडून हस्तगत करण्यात आली. पुढील चौकशीत मुल येथील मंदिरातील चोरीप्रकरणातही त्याचा सहभाग स्पष्ट झाला.
या गुन्ह्यांमध्ये वापरलेली यामाहा आर वन मोटारसायकल आणि मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केला आहे. एकूण सोने, चांदी, वाहन व इतर साहित्य असा १७ लाख ७८ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई नवनियुक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा रजनीकांत पुटटावार, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले, दिनेश आराडे, नितिन कुरेकर, नितिन साळवे, प्रमोद कोटनाके, सुरेद्र महतो, निराशा तितरे, उषा लेंडगे, पोअं प्रफुल्ल गारघाटे, शेखर माथनकर, अमोल सावे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.








