Home आपला जिल्हा Breaking News आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात Ø 1 ते 15 मे या कालावधीत...

आजपासून जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरवात Ø 1 ते 15 मे या कालावधीत स्वयंगणना करण्याची सोय

94
Ø जिल्हाधिका-यांनी घेतला यंत्रणेचा आढावा
चंद्रपूर, दि. 30 : सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी 1 मे 2026 पासून जनगणनेला सुरवात होत आहे. देशातील ही पहिलीच डिजीटल जनगणना असून 1 ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात जनगणना शुभारंभाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी गुरुवारी (दि. 30) सर्व यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, तहसीलदार विजय पवार, प्रभारी नियोजन अधिकारी सुभाष कुमरे यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे. विविध यंत्रणांनी आपापल्या क्षेत्रातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, सभापती आदींची स्वयं गणना करावी. तसेच नागरिकांनासुध्दा स्वयं गणनेसाठी प्रवृत्त करावे. अधिकारी – कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्यवस्थित घ्यावे. जनगणनेबाबत शासन स्तरावरून रोजच आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
अशी राहील स्वयंगणनेची प्रक्रिया :
1) संकेतस्थळाचा वापर आणि लॉगिन : https://se.census.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. राज्य / केंद्रशासित प्रदेश निवडा. कॅप्चा प्रविष्ट करा.
2) कुटुंब नोंदणी : कुटुंब प्रमुखाचे नाव. 10 अंकी मोबाईल क्रमांक. ई- मेल आयडी असल्यास प्रविष्ट करा. कुटुंब प्रमुखाचे नाव नंतर बदलता येणार नाही. प्रत्येक कुटुंबासाठी फक्त एकच मोबाईल क्रमांक वापरावा. एकदा नोंदणी झाल्यावर तोच क्रमांक इतर कोणत्याही कुटुंबासाठी वापरता येणार नाही.
3) भाषा आणि ओटीपी पडताळणी : पसंतीची भाषा निवडा आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ओटीपी प्रविष्ट करा. निवडलेली भाषा नंतर बदलता येणार नाही.
4) स्थानाचा तपशील द्या : जिल्हा निवडा आणि परिसर / गाव / नगर व पीन कोड प्रविष्ट करा.
5) नकाशावर आपले निवासस्थान शोधा : आपली अचूक निवासी इमारत ओळखण्यासाठी आणि स्थानाची पुष्टी करण्यासाठी नकाशावरील लाल मार्कर ड्रॅग करा.
6) प्रश्नावली पूर्ण करा : टूलटिप्स, वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि आवश्यक माहिती टिपांच्या मार्गदर्शनानुसार घरसुची आणि गृह गणना प्रश्नावली भरा.
7) पूर्वावलोकन आणि पुनरावलोकन : प्रविष्ट केलेला सर्व डेटा तपासण्यासाठी पुर्वावलोकन स्क्रीनचा वापर करा. तुम्ही नोंदी संपादीत करू शकता. नंतर सादर करण्यासाठी मसुदा जतन करू शकता किंवा अंतिमरित्या सादर करू शकता.
😎 अंतिम सादर करणे : तुमचा डेटा लॉक करण्यासाठी ‘अंतिम सादर करा’ वर क्लिक करा. अंतिम सादर केल्यानंतर कोणतेही बदल करता येणार नाहीत. सादर केल्यानंतर 11 अंकी एस.ई आयडी (एसएमएस) आणि ईमेल दिले असल्यास त्यावर येईल.
9) गणकाची भेट : जेव्हा जनगणना गणक तुमच्या घरी भेट देईल, तेव्हा तुमचा एस.ई. आयडी त्यांना सांगा. जर एस.ई. आयडी विद्यमान नोंदीशी जुळला तर तपशील निश्चित करून सादर केले जातात. अन्यथा गणक नव्याने डेटा गोळा करेल.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन : नागरिकांनी दिलेली माहिती गुप्त ठेवली जाईल व केवळ जनगणना कार्यासाठीच वापरली जाईल. त्यामुळे नागरिकांनी अचूक माहिती भरावी. तसेच 15 मे नंतर घरी आलेल्या प्रगणकाला सहकार्य करून या राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.