Home आपला जिल्हा Breaking News कृषि महाविद्यालय, मूल येथे “Fragrance-2026” वार्षिक स्नेहसंमेलन

कृषि महाविद्यालय, मूल येथे “Fragrance-2026” वार्षिक स्नेहसंमेलन

113

कृषि महाविद्यालय, मूल येथे आयोजित करण्यात आलेल्या “Fragrance-2026” या वार्षिक स्नेहसंमेलनाचा समारोप सोहळा नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दिनांक १० व ११ मार्च, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शरद निंबाळकर (माजी कुलगुरू, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला) तसेच डॉ. झिन्झार्डे (माजी सहयोगी प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, नागपूर) उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. व्ही.जी. अतकरे (सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय, मूल) होते. यावेळी मंचकावर डॉ. आर.पी. गजभिये, (प्राध्यापक, उद्यानविद्या) डॉ. गितांशु टी. डिंकवार (सहायक प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग तथा सहायक विद्यार्थी कल्याण अधिकारी) तसेच श्री. एस.एम. धोटे (सहायक विभाग अधिकारी) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोप देऊन स्वागत करून करण्यात आली. यानंतर डॉ. आर.पी. गजभिये यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडत स्नेहसंमेलनाच्या उद्देशाविषयी माहिती दिली.

कृषि महाविद्यालयाच्या आठव्या सत्रातील विद्यार्थी प्रीतम धुर्वे, बलवीर जुनगरी, भूषण हावरे आणि चैताली बेलेकर यांनी पहिल्या वर्षापासून आतापर्यंतच्या आपल्या महाविद्यालयीन प्रवासातील अनुभव व आठवणी उपस्थितांसमोर मांडल्या. यावर्षी पदवीधर होणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या मनोगतामुळे वातावरण भावूक झाले होते. बक्षीस वितरण समारंभात “Fragrance-2026” दरम्यान घेतलेल्या विविध क्रीडा स्पर्धा, फ्लॅश मॉब, आनंद मेळावा, निबंध लेखन, पोस्टर, मंडला आर्ट, रांगोळी, प्रश्नमंजुषा, वादविवाद तसेच विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. 

कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे डॉ. शरद निंबाळकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कविता व शायरींचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडताना “माती आणि माता हि सृजनाचा प्रतिक आहे” असे सांगितले. कठोर परिश्रम, सकारात्मक विचार आणि ध्येयाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास विद्यार्थी जीवनात मोठे यश मिळवू शकतात, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून मेहनतीच्या बळावर जग जिंकावे, असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही.जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत स्नेहसंमेलनासारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले व विध्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाव्या सत्रातील राणी बांते व दुसऱ्या सत्रातील भावना चरपे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. नागेश नवघरे (सहायक प्राध्यापक, मृद विज्ञान) यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाला महाविद्यालाचे सर्व प्राध्यापाकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध स्पर्धांचे आयोजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ‘फ्रेग्रन्स-२०२६’ स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.