पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (बी. एचएमसीटी), बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (बीसीए), बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए), बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (बीबीएम), बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) या सात अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीला ४ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
या सात अभ्यासक्रमास आजपर्यंत ४१,२४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. प्रवेश परीक्षा २८ ते ३० एप्रिलदरम्यान होणार आहे. २०२५ च्या बी. एचएमसीटी सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १४३६ व बीसीए / बीबीए / बीएमएस/ बीबीएम / एमबीए (इंटिग्रेटेड) / एमसीए (इंटिग्रेटेड) सीईटी या प्रवेश परीक्षेमध्ये १,१२,९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जातील. उमेदवारांनी पुढील अद्ययावत माहिती, तपशीलवार वेळापत्रक आणि परीक्षेशी संबंधित सूचनांसाठी नियमितपणे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे. या अभ्यासक्रमास एकूण ४१,२४९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे सांगण्यात आले.






