Home आपला जिल्हा Breaking News कोण मारणार मुल नगरपालिका निवडणुकांमध्ये बाजी ?

कोण मारणार मुल नगरपालिका निवडणुकांमध्ये बाजी ?

83

मूल नगर पालिका निवडणुकीत नेत्यांचीच खरी सत्व परीक्षा
अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार?


मूल:- 2 डिसेंबर 2025 रोजी नगरपालीका निवडणूकीसाठी मतदान होणार असून या ठिकाणी प्रचाराचा धडाडा पाहायला मिळतो आहे. मूल नगरपालिकांमध्ये 1 नगराध्याक्ष काही 10 प्रभागात निवडणूकीत तिरंगी तर चौरंगी लढत होणार आहे. निवडणूकीत विजयी होण्यासोबतच पाडा—पाडीचे राजकारणही मोठया प्रमाणात केले जात आहेत.दोन डिसेंबर रोजी होवू घातलेल्या मूल नगर पालिका निवडणुकीत नेत्यांचीच खरी सत्व परीक्षा होणार आहे. मुख्य नेते विविध घटकांना सोबत घेऊन बैठकांवर जोर देत आहेत. तब्बल चार वर्षानंतर या निवडणुका होत असल्याने सर्वच पक्षांसह मूलवासियांमध्ये मोठी उत्सूकता आहे.त्यामुळे मूल नगर पालिका निवडणुकीत मुख्य राष्ट्रीय पक्षांसह घटक पक्ष सुदधा गुडघ्याला बाशिंग बांधून आपले नशिब अजमावीत आहेत. आपल्याच पक्षाचा झेंडा पालिकेवर फडकावा यासाठी त्यांचे कसोसीचे प्रयत्न आहेत. मूल नगर पालिकेच्या संदर्भात अनेक पक्षांच्या मनात विविध विकासकामांविषयी स्वप्ने आहेत. ती स्वप्ने साकारण्यासाठी त्यांना सत्तेची आवश्यकता आहे. पालिकेला प्राप्त होणारा विविध प्रकारचा नगर विकास निधी आणि त्यातून होणारे विविध विकास कामे यांवरही राजकीय पक्षांचा डोळा आहे. त्यामुळे सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या क्लृप्त्या किती प्रभावी ठरतात हे मतमोजणीनंतरच ठरणार आहे.
सगळेच मैदानातः- स्थानिक मूल मध्ये भाजप आणि काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे 20 उमेदवार रिंगणात उतरवले आहे.शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक पदासाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना शिंदे गट सुदधा नगराध्यक्ष पदासह रिंगणात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट सुदधा नगरसेवक पदासाठी नऊ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटानेही तीन उमेदवार रिंगणात उतरवले आहे. बसपाने आपल्या आघाडीसह नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात उतरवून आपले भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न करीत आहे. नगराध्यक्ष पदासाठी एक अपक्ष महिला उमेदवार रिंगणात आहे. घटक पक्षांनी स्वतंत्रपणे मूल नगर पालिका निवडणुकीत उडी मारून काँग्रेस आणि भाजपा या मुख्य राष्ट्रीय पक्षांना एक प्रकारे आव्हान दिले आहे. कोणत्या पक्षाचे किती राजकीय प्राबल्य आहे, हे येणा-या दिवसात स्पष्ट होणार आहे.

लोकशाहीत निवडणुका लढविण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे घटक पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुकीत उडी मारल्याने मूल नगर पालिकेची निवडणूक रंगतदार आणि अटीतटीची होणार आहे. कोणाचे किती राजकीय प्रगल्भ आणि प्राबल्य, कोण हरणार कोण जिंकणार, घटक पक्षाचे किती उमेदवार निवडून येणार, उमेदवारांना किती मते मिळणार याची उत्सूकता मतदारांना लागली आहे. तुर्तास वार्डावार्डात, चावडीवर याची चर्चा चवीने चर्चील्या जात आहे.
नगर पालिका निवडणूक प्रतिष्ठेची आणि महत्वाची असल्याने येथे मुख्य पक्षांसह घटक पक्षांच्या नेत्यांचीच खरी सत्व परीक्षा दोन डिसेबर रोजी होणार आहे. या परिक्षेत कोण पास आणि कोण नापास होणार हे मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे. मूल नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या गुणपत्रिकेत कोणाला किती मार्क मिळतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तुर्तास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसह नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांचा वार्डावार्डात डोअर टु डोअर फिरुन अभ्यास सुरु आहे. या अभ्यासावरच राजकीय पक्षांचे भवितव्य अवलंबुन राहणार आहे.
नगराध्यक्ष पदासाठी पाच महिला उमेदवार रिंगणातः- येथील नगराध्यक्ष पद नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलासाठी राखीव आहे. त्यासाठी काँग्रेसतर्फे एकता प्रशांत समर्थ, भाजपतर्फे प्रा. डॉ. किरण किशोर कापगते, शिवसेना शिंदे गटातून भारती सुनिल राखडे,बसपा कडून चैताली मल्हारी मद्रीवार आणि गीतांजली शोन तांगडे या अपक्ष म्हणून आपले नशीब अजमावीत आहेत. थेट जनतेतून यांची निवड होणार आहे. पाचही महिला उमेदवारांचे पारडे जड असले तरी, मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारांमध्येच होण्याची चिन्हे आहे. कोण बाजी मारतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.