Home आपला जिल्हा Breaking News कृषि महाविद्यालय, मूल चा उत्स्फूर्त सहभाग@”शिवार फेरी २०२५”

कृषि महाविद्यालय, मूल चा उत्स्फूर्त सहभाग@”शिवार फेरी २०२५”

59

विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान, वाण, शिफारसीनुसार वापरायच्या पीक पद्धती, रोग-कीड नियंत्रणासाठीच्या जैविक उपचार पद्धती तसेच यंत्रे व उपकरणे इत्यादी एकाच ठिकाणी पाहता यावेत, व त्याबाबतचे मार्गदर्शन देता यावे या हेतूने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक २० ते २२ सप्टेंबर २०२५ रोजी शिवारफेरी चे आयोजन करण्यात आले. या शिवारफेरी मध्ये कृषि महाविद्यालय, मूल जि. चंद्रपूर येथील ४३ विद्यार्थी, ४ स.प्राध्यापक आणि ९ शेतकरी यांनी सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्षिक “शिवार फेरी – २०२५” तसेच थेट पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

 ही शिवार फेरी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला आणि महाराष्ट्र राज्य कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, मा. कुलगुरू डॉ. शरद गडाख (डॉ. पी.डी.के.व्ही., अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जसे धान, गहू, ज्वारी, बाजरी, मक्का, भाजीपाला, कडधान्य, तेलबिया, चारापिके, नगदी पिके इत्यादी आयोजित करण्यात आली होती. या शिवारफेरी मध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर लावलेली विविध पिके, पिक पद्धती, प्रक्रिया उद्योग तसेच दुग्धशास्त्र विभागाला भेट देऊन तेथील विविध गोवंशाचा अभ्यास केला. यावेळी जनावरांचे व्यवस्थापन, दुग्धजन्य उत्पादने व उपउत्पादनांची सखोल माहिती त्यांनी आत्मसात केली.

शिवार फेरीत २५ एकर क्षेत्रावर ३०० हून अधिक सुधारित पिके व तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, १७०० हेक्टर क्षेत्रावर ब्रीडर बीज उत्पादन व संशोधन कार्यक्रम राबविण्यात आला होता. तसेच २० पेक्षा अधिक खाजगी कृषि कंपन्यांचा सहभाग लाभला. या उपक्रमात परिसरातील शेतकरी, शेतमजूर व महिला स्वयंसहायता गट सदस्यांचाही उत्साहपूर्ण सहभाग होता. या कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कृषि वैज्ञानिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली, ज्यामुळे आधुनिक शेती, प्रक्रिया उद्योग आणि पशुपालन व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष ज्ञान मिळून सिद्धांत व व्यवहार यांचा संगम साधता आला. या उपक्रमात महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अक्षय इंगोले, डॉ. भूषण ठाकरे, डॉ. गितांशु डिंकवार व डॉ. प्रविणा बरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.