Home आपला जिल्हा Breaking News चिरोली@रेल्वे मालगाडीच्या धडकेत बिबट गंभीर जखमी

चिरोली@रेल्वे मालगाडीच्या धडकेत बिबट गंभीर जखमी

75

मूल (चंद्रपूर) : बल्लारपूरवरून गोंदियाकडे जाणाऱ्या रेल्वे मालगाडीने धडक दिल्याने बिबट गंभीर जखमी झाला. ही घटना चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मूल नियतक्षेत्र चिरोली अंतर्गत कक्ष क्रमांक ७१८ जवळ बल्लारपूर-गोंदिया रेल्वे मार्गावर बुधवारी पहाटे ४:३० वाजता घडली.
बिबट्याचे वय जवळपास एक वर्षाचे असून नर जातीचा आहे. वनविभागाचे
कर्मचारी गस्त करीत असताना बल्लारपूर गोंदिया रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक १२०६ जवळ बिबट्याचा उजव्या पायाचा पंजा तुटलेल्या अवस्थेत रेल्वे पटरीवर आढळून आला. वनकर्मचाऱ्यांनी इतरत्र शोधाशोध केली असता, घटनेच्या बाजूलाच रेल्वे पटरीजवळ असलेल्या झुडपात जखमी अवस्थेत बिबट बसून असल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देताच, वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर जाळीच्या साहाय्याने बिबट्याला पकडण्यात यश आले. बिबट्यावर उपचार करण्यासाठी चंद्रपूर येथील टीटीसी केंद्रात पाठविण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वन अधिकारी राजन तलमले, सहायक वनसंरक्षक व्ही. एस. तरसे यांच्या मार्गदर्शनात चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती व्ही. महेशकर, क्षेत्र सहायक मनीष आर. नीमकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पोडचेलवार, टीटीसी चंद्रपूर व आर. आर. यू. टीम चंद्रपूर व वन कर्मचारी उपस्थित होते.