मुल : गडिसुर्ला येथे नुकतेच ज्ञानज्योती बुद्ध विहार गड़िसुर्लाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना आणि ज्ञानज्योती बुद्ध विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार
पडला.व या कार्यक्रमात विविध साहित्यिक, सांस्कृतिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात स. ८ वा. ध्वजारोहण व भिक्षु संघाच्या बौद्ध वंदना कार्यक्रमाने झाली. त्यानंतर स. ९ वा. भिक्खू संघाच्या मार्गदर्शनाखाली धम्मदेसना पार पडली. कार्यक्रमाचे मुख्य सत्र दुपारी १२ वा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन प्रा. इसादास भडके, शारदा येणुरकर यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी अविनाश वाळके होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून रवी कांबळे यांनी बाबासाहेबांची धम्म क्रांती आणि बौद्धांचे कर्तव्य विषयावर व्याख्यान केले, विलास दुर्गे यांनी पंचशील आणिधम्मविषयावर व्याख्यान केले, डॉ. विद्याधर बन्सोड यांनी बुद्ध
धम्माचा -हास का झाला यावर, तर रविकिरण तावाडे, हिरालाल भडके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सायं ७ वा. सुप्रसिद्ध सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे जाहीर प्रबोधन विशेष आकर्षण ठरले. यामध्ये मोठ्या संख्येनेनागरिकांनी उपस्थित राहून प्रबोधनाचा लाभ घेतला.कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ज्ञानज्योती बुद्ध विहाराची उभारणी, बौद्ध धर्माच्या प्रचार- प्रसारासाठी स्थानिक पातळीवर उचललेली पावले, तसेच सामाजिक समता व बंधुतेचा संदेश देणारी ही उपक्रममालिका भविष्यात अधिक प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष सुनील वाळके, उपाध्यक्ष गजानन रामटेके, सचिव हरिदास वाळके, अशोक भसारकर, राजेंद्र दुर्गे व ज्ञानज्योती बुद्ध विहार गडिसुर्लाच्या संपूर्ण सदस्यांनी परिश्रम घेतले. (ता.प्र.)