आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली माहिती
पुणे: राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २७ ते ३० मे आणि २ ते ५ जून अशा दोन टप्प्यात होत आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी
प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी ही परीक्षा २४ मे ते ५ जून या कालावधीत होणार होती. परंतु, परीक्षेस प्रविष्ठ उमेदवारांच्या संख्येनुसार व उपबल्ध भौतिक सुविधेनुसार यामध्ये बदल करण्यात आला असून, नव्या वेळापत्रकानुसार परीक्षा आता २७ मेपासून सुरू होत आहे. वेळापत्रकात वेळप्रसंगी बदल होऊ शकतो, असे परिषदेकडून उमेदवारांना २५ एप्रिलच्या अधिसूचनेद्वारे कळवण्यात आले होते.
परीक्षेच्या नव्या तारखा, माहिती पुस्तिका व सूचनांची माहिती परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राज्यातील सर्व पात्र उमेदवारांना परीक्षेसाठी अर्जनोंदणीस १४ मेपर्यंत मुदत देण्यात आली. त्यानुसार राज्यभरातून २ लाख ३६ हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने तितक्या प्रमाणात परीक्षा केंद्रांची उपलब्धता आणि सुविधा याचे नियोजन निर्धारित वेळापत्रकानुसार होऊ शकले नाही, त्यामुळे परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली.