अनुदानावर मिळणार दुधाळ गाई, तुम्ही अर्ज केला काय?
राज्याच्या पशुसंवर्धनविभागामार्फत राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसाहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व तलंगांचे वाटप केले जाणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पशुपालक ३ मे ते २ जून या कालावधीत अर्ज करू शकतात. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. पशुपालकांनी शक्यतो स्वत:चा मोबाइल नंबर द्यावा.
त्याच मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार आहे. अर्जदाराने आपला मोबाइल क्रमांक बदलू नये. मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
यांच्याशी संपर्क साधा
योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
२ जुलैला जाहीर होणार लाभार्थ्यांची पात्रता यादी
१३ मे ते २ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २५ ते २७ जून या कालावधीत लाभार्थ्यांमार्फत कागदपत्रातील त्रुटींची पूर्तता केली जाईल. २ जुलै रोजी लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली जाणार आहे.