चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून नवजात बाळाची चोरी, पोलिसांकडून आरोपी महिलेला अटकचंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती गृहातून चार दिवसांच्या नवजात बाळाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बाळ चोरून नेणारी एक महिला असून ती रुग्णालय परिसरात 3 ते 4 दिवसांपासून वावरत होती. फिर्यादी महिलेसोबत तिने ओळख निर्माण केली होती. विश्वास संपादन केल्यावर आज सकाळी बाळाला सोबत घेऊन ती रुग्णालयातून बाहेर पडली. बराच वेळ होऊन गेला तरीही ती परत आली नाही. त्यामुळे बाळाच्या आई, वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
रुग्णालयातून बाळाला पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलीस चंद्रपूर शहर पोलीस तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले.
त्यांनी सीसीटीव्ही तपासून बाळा कुठे सापडेल, याचा शोध सुरू केला. या घटनेची सर्व माहिती पोलीस स्थानकात देण्यात आली आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून ताब्यात घेतले आहे.
आरोपी महिलेचे नाव जेईबान सुभाद शेख असे असून ती वर्धा जिल्ह्यातील आहे. बाळ सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापूर्वीही एका महिलेचे नवजात बाळ रुग्णालयातून चोरी झाले होते.
या बाळाचा अद्याप शोध लागलेला नाही. अशा घटना वारंवार होत असल्याने रुग्णालय सुरक्षेचा प्रश्न रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.






