Home आपला जिल्हा Breaking News गावची लेक अधिकारी झाली, गावाने केलं धूमधडाक्यात स्वागत

गावची लेक अधिकारी झाली, गावाने केलं धूमधडाक्यात स्वागत

134

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील अत्यल्प भुधारक शेतमजुराची मुलगी अधिकारी झाली. मुलीन गावाचं नाव मोठं केल्याने गावाने ढोल, ताश्याचा गजरात मिरवणूक काढली.

फुलांचा वर्षाव केला. महिलांनी औक्षण केलं. गावानं केलेलं भव्य दिव्य स्वागत बघून ती भावनिक झाली.

शालु शामराव घरत प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या संयुक्त गट क परीक्षेमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून राज्यात तिने प्रथम क्रमांक मिळवीला. आता ती उद्योग निरीक्षक पद भुषविणार आहे. चिमूर तालुक्यातील पांढरवानी गावातील शालु शामराव घरत हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळेत झाले. यानंतरचे शालेय शिक्षण नेरी येथील सरस्वती कन्या विद्यालय येथे घेतले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा येथे पुर्ण करून विज्ञानातील पदवी (बीएसी) चे शिक्षण नवरगाव येथील ज्ञानेश महाविद्यालयातुन पूर्ण केले. सध्या तिचे पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात विज्ञान विषयातील पदवित्तेर शिक्षण सुरु आहे. विज्ञान विषयातील पदवि मिळविल्या नंतर अधिकारी बनण्याच्या उद्देशाने नेचर फाउंडेशन अंतर्गत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण तिने घेतले. यादरम्यान तिच्या संघर्षाची आणि जिद्दिची दखल ब्राईटएज फाउंडेशने घेतली.

ब्राईटएज फाऊंडेशनच्या मॅजिक परिवारामार्फत देण्यात येणाऱ्या सहारा शिष्यवृत्ती करीता शालुची निवड करण्यात आली. या शिष्यवृत्ती मधुन दरमहा आर्थिक मदत तीला मिळत होती. ज्यामुळे तिला पुणे सारख्या शहरात विज्ञानातील पदवित्तर शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. शालुने मिळविलेल्या यशाचे कौतुक जिल्हाभरात होत आहे. ती गावात येताच गावाकर्यांनी तिचे जोरदार स्वागत केलं. जीवनात काहीतरी करून यशस्वी व्हायचे होते. नेचर फाउंडेशनने माझ्यामध्ये अधिकारी होण्याच्या स्वप्नाचे बीज रोवले आणि त्या स्वप्नाला भक्कम आर्थिक पाठबळ ब्राईट एज फाउंडेशन व मॅजिक परिवाराच्या सहारा स्कॉलरशिपने दिले. यामुळेच पुणे सारख्या ठिकाणी मला शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली. अभ्यासात सातत्य आणि नियोजन असले तर यश नक्की मिळते, असे मत शालू ने व्यक्त केलं.