Home आपला जिल्हा Breaking News मुदतवाढ…@टीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यास २४ एप्रिलपर्यंत

मुदतवाढ…@टीईटी ऑनलाईन अर्ज भरण्यास २४ एप्रिलपर्यंत

52

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२६ २१ जून २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज
भरण्यासाठी २४ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा घेण्यात येत. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी टीईटी परीक्षा घेतल्यानंतर आता जून २०२६ मध्ये परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी २७ मार्च ते १६ एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील काही उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन परिषदेने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यार्थ्यांना २४ एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याचे परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध
या परीक्षेशी संबंधित शासन निर्णय व सूचना, तसेच ऑनलाइन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे आणि परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती https://mahatet.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.
नोव्हेंबरमधील परीक्षेत ५० हजार उमेदवार पात्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नोव्हेंबर २०२५ मध्ये ३७ जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या परीक्षेत ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून दोन्ही पेपर मिळून तब्बल ११.२८ टक्के उमेदवार उत्तीर्ण झाले. राज्यात दोन्ही पेपर मिळून ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवारांनी परीक्षा दिली. तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित होते.
परीक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले. तर ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ११.२८ टक्के लागला आहे. एकूण आठ माध्यमांत घेण्यात आलेल्या या परीक्षेत मराठी माध्यमाच्या उमेदवारांचा टक्का जास्त आहे.