नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ चा निकाल याच आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. परीक्षेपूर्वीच ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले होते.
त्या पार्श्वभूमीवर १७ जानेवारीपूर्वी म्हणजेच चालू आठवड्यातच निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता असून लाखो परीक्षार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.
दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. प्राथमिक शिक्षकांसाठीच्या पेपर १ साठी राज्यभरातून २ लाख ३ हजार ३३३ उमेदवार बसले होते, तर उच्च प्राथमिक शिक्षकांसाठीच्या पेपर २ साठी २ लाख ७२ हजार ३३५ उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अशा प्रकारे एकूण ४ लाख ७५ हजार ६६८ डीएड पदविकाधारक आणि बीएड पदवीधर उमेदवारांनी टीईटी दिली.






