गडचिरोली : जिल्हा पोलिस विभागातर्फे पोलिस शिपाई व वाहन चालक (ड्रायव्हर) पदासाठीची भरती प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली असून, २० जानेवारीपासून गडचिरोली येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या निर्देशानुसार दोन दिवसांपूर्वीच मैदानाचे सपाटीकरण व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शारीरिक चाचणीची तारीख जवळ येताच शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक- युवतींमध्ये उत्साह संचारला आहे. पहाटेपासूनच मुख्यालयाच्या मैदानावर धावण्याचा सराव, उड्या, शक्ती चाचणी यांसाठी उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. अनेकांनी वैयक्तिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला असून, काही उमेदवारांनी गटाने सराव करत आपली सहनशक्ती वाढविण्यावर भर दिला आहे. शारीरिक चाचणीबरोबरच लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातूनही उमेदवार तयारीत व्यस्त आहेत.
लेखी परीक्षेच्या सरावावर भर, युवक तयारीला भिडले
नियमित अभ्यास, सराव प्रश्नसंच, तसेच शारीरिक तंदुरुस्ती यांचा समतोल साधत उमेदवार मेहनत घेत असल्याचे चित्र आहे. पोलिस भरतीतून स्थिर नोकरीची संधी मिळणार असल्याने ग्रामीण व शहरी भागातील तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.






