Home आपला जिल्हा Breaking News आई-बापाच्या कष्टाचे चीज करीत मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

आई-बापाच्या कष्टाचे चीज करीत मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक

84

राकेशचा प्रवास; गुरे राखणाऱ्या काठीपासून जनतेच्या रक्षणाच्या लाठीपर्यंत….!
गरीबी, संघर्ष व अपयशावर मात; गुरे राखणाऱ्याचा मुलगा झाला पोलिस उपनिरीक्षक
सावली : सावली तालुक्यातील डोनाळा येथील राकेश अल्लीवार या तरुणाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालून हजारो तरुणांसमोर आदर्श उभा केला आहे. गुरे राखणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा आज जनतेच्या संरक्षणासाठी वर्दीतील अधिकारी झाला आहे.
गुरे राखणाऱ्या काठीऐवजी वर्दी आणि जनतेच्या संरक्षणाची लाठी मुलाच्या हाती पाहन आई-वडील, बहीण आणि भाऊजी यांच्या चेहऱ्यावर अभिमान व समाधान स्पष्ट दिसत होते. राकेशचे आई-वडील कौशल्याबाई व बंडू अल्लीवार हे मूळचे मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील मेंढपाळ व्यवसाय करणारे. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तब्बल ३५ वर्षापूर्वी उपजीविकेसाठी ते डोनाळा येथे स्थायिक झाले. आई-वडील अशिक्षित, घरात शिक्षणाचा कोणताही वारसा नसतानाही राकेश लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता.
प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, डोनाळा येथून आणि माध्यमिक शिक्षण भय्याजी पा. भांडेकर हायस्कूल, कापसी येथून पूर्ण केल्यानंतर त्याने गडचिरोली येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली.
‘मिशन एमपीएससी’ची जिद्दयानंतर राकेशने महाराष्ट्र’लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीतयारी सुरू केली. वनपरीक्षेत्र, तलाठी,
एसटीआय, एएसओ अशा विविधपरीक्षांमध्ये तो प्रतीक्षा यादीत आला, मात्र थोडक्यात संधी हुकली.
अनेक अपयशांनी त्याची वाट अडवली, पण जिद्द मात्र ढळली नाही. गुरे राखून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नातून त्यांनी राकेशच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. अखेर मेहनतीचे चीज झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या बॅचमध्ये भटक्या जमाती (क) प्रवर्गातून राकेश अल्लीवार नागपूर विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला.
वर्दीतला मुलगा…. आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू
नाशिक येथे पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले. परेडदरम्यान अधिकारी आपल्या आई-वडिलांना सलामी देतात, तो क्षण अल्लीवार कुटुंबासाठी अविस्मरणीय ठरला. नऊवारी लुगडं नेसलेली आई, अंगात धोतर बंडी घातलेले वडील, आणि त्यांच्या समोर वर्दीत, हातात लाठी घेतलेला अधिकारी मुलगा, हे दृश्य पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.