अज्ञात चोरट्यांचा धाडसी प्रवेश :
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल तालुक्यातील चिखली गावात भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे.
गणेश वसंत मंडलवार (४५) यांच्या घरी २४ डिसेंबर रोजी ही घटना घडली. सकाळी मंडलवार शेतात गेले होते, तर घरातील इतर सदस्य घरीच होते. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता घरातील आलमारीचे कुलूप तुटलेले आढळून आले. तपासणी केली असता आलमारीत ठेवलेले दोन तोळ्याचा सोन्याचा गोफ, अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी, दहा तोळ्याची चांदीची येर व रोख ५०० रुपये चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, मंडलवार यांची मुलगी अन्यन्या हिने सायंकाळी सुमारे ४.३० वाजता घरामागील शेतालगत दोन संशयित इसम पाहिल्याची माहिती दिली. काळ्या रंगाची हुडी परिधान केलेले, सडपातळ बांध्याचे व २५ ते ३० वयोगटातील हे दोघे इसम तिला पाहताच पळून गेल्याचे सांगण्यात आले.
घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज असून, या प्रकरणी मुल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुल पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू
आहे.






