Home आपला जिल्हा Breaking News अपघातात मृत भाकरे पोलिस पाटलांच्या वारसांना ४४ लाखांचा धनादेश

अपघातात मृत भाकरे पोलिस पाटलांच्या वारसांना ४४ लाखांचा धनादेश

83

ॲक्सिस बँकेचा पुढाकार; पोलिस पाटील संघटनेच्या प्रयत्नांना यश
मूल : मूल पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या जुनगाव येथील पोलिस पाटील कान्हुजी मोतीराम भाकरे (४६) यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना तब्बल ४४ लाख रुपयांचा विमा धनादेश प्रदान करण्यात आला. या प्रकरणात
अॅक्सिस बँकेचा पुढाकार आणि पोलिस पाटील संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे. सामान्यतः बँका ग्राहकांचे व्यवहार आणि कर्जपुरवठा यापुरतेच मर्यादित राहतात; मात्र अॅक्सिस बँकेने समाजाभिमुख भूमिका घेत खातेधारकाच्या मृत्युनंतर कुटुंबीयांना आर्थिक आधार देण्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे. १३ एप्रिल २०२५ रोजी जुनगाव-नांदगाव मार्गावर देवाडा गावाजवळ झालेल्या ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण धडकेत पोलिस पाटील कान्हुजी भाकरे गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेत असताना
वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मानधनाचे खाते अॅक्सिस बँकेत असल्याने मूल तालुका पोलिस पाटील संघटनेने तत्काळ बँकेमार्फत विमा दावा दाखल केला. बँकेने तो दावा मंजूर करून ४४ लाख रुपयांची विमा रक्कम मंजूर केली.
ही रक्कम गुरुवारी दि. १६ चंद्रपूर येथील नियोजन भवनात झालेल्या कार्यक्रमात पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अप्पर पोलिस अधीक्षक कातकडे यांच्या हस्ते मृत पोलिस पाटलांच्या वारसांना धनादेश देण्यात आला.
या प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले, अॅक्सिस बँकेचे क्लस्टर हेड सोमित यादव, सॅलरी विभाग प्रमुख सचिन मोरे, मूल शाखा व्यवस्थापक राकेश वल्लालवार, गणेश मोरे, तसेच जिल्हा पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष योगेश मत्ते, नागपूर जिल्हा अध्यक्ष राकेश दुरूरकर, उपाध्यक्ष नितेश वाटोळे, सचिव विजय पादे, कोषाध्यक्ष सदाशिव वारे, किशोरमेश्राम, मूल तालुका अध्यक्ष शशिकांत गणवीर, उपाध्यक्ष अमोल वाकुडकर, सचिव संतोष शुद्धलवार, गोपाल ठिकरे, पुंडलिक जवादे, संगीता चलावार आदी मान्यवर उपस्थित होते. संघटनेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा विमा दावा मंजूर झाला असून, राज्यातील पोलिस पाटलांना एवढ्या मोठ्या विमा रकमेचा लाभ मिळाल्याची ही पहिली घटना ठरली आहे. त्यामुळे भाकरे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, संघटनेच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत गणवीर, तर संचालन नितेश
वाटोळे आणि अमोल वाकुडकर
यांनी केले.