Home आपला जिल्हा Breaking News कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे आरोग्य व सिकलसेल तपासणी शिबिर

कर्मवीर महाविद्यालयात मूल येथे आरोग्य व सिकलसेल तपासणी शिबिर

64

अनुवांशिक रोग टाळण्यासाठी प्रत्येकांनी सिकेलसेल तपासणी करावी : प्राचार्या डॉ. वाळके
मूल : शिक्षणप्रसारक मंडळ, मूल दवारा संचालित व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित कर्मवीर महाविद्यालय, मूल येथे नुकतेच आरोग्य व सिकेलसेल तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वाळके यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात
सिकेलसेल हा रोग अनुवांशिक स्वरूपाचा असल्याने तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सरळपणे जातो, त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची तपासणी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच ‘अनुवांशिक रोगांचे प्रमाण समाजात कमी करण्यासाठी विवाहपूर्व सिकेलसेल तपासणी करणेही आजची मोठी गरज आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय, मूल येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ अश्विनी ऐंबरवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
करतांना सिकलसेल या आजाराची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जर दोन्ही पती-पत्नी सिकेलसेल वाहक (ट्रेट) असतील तर पुढील पिढीत गंभीर रुग्ण निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे समाजात जागृत करून विवाहापूर्वी तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या शिबिरात कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. बनकर, राष्ट्रीय सेवा योजना (प्लस२) चे अधिकारी प्रा. बोधे, प्रा. शेलेकर, महाविद्यालयातीलप्राध्यापकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी तपासणी करून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. संपूर्ण शिबिराचे यशस्वी आयोजन प्रा. निखिल दहिवले यांनी केले. तसेच कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने यात सहभाग दर्शविला. पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर व सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. (ता. प्र. )