जूनमध्ये रांगा लागणार, वेळ जाणार; पाल्यांचे दाखले काढून ठेवणार का?
धावपळ टाळता येणे शक्य: पढील शैक्षणिक सत्रासाठी होणार मदत
दहावी, बारावीची परीक्षासंपली आहे. त्यानंतर निकाल लागताच पाल्यांच्या शिक्षणाची चिंता पालकांना असते. पाल्याला पुढील शिक्षण कोणते द्यायचे, याचे नियोजन तयार असते. त्यासाठी लागणाऱ्या विविध दाखल्यांसाठी मात्र ऐनवेळी जूनपासून धावपळ सुरू होते. आता एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मराठी नववर्षात विविध दाखले काढून ठेवण्याची मानसिकता पालकांनी आताच केली पाहिजे. त्यामुळे पुढील धावपळ वाचणार आहे. दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाचे अनेक मार्ग आहेत. अलीकडील काही वर्षांपासून या शिक्षणासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता अधिक भासू लागली आहे. मुळात दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या पाल्यांच्या पुढील शिक्षणाचे नियोजन आधीच झालेले असते. परंतु त्यासाठी आवश्यक दाखला काढण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. याची माहिती घेण्याकडे बहुतांश पालकांचे दुर्लक्षच होते. परीक्षा संपल्यानंतर दोन ते अडीच महिन्यांची सुटी असते.
पाल्याच्या शिक्षणाची दिशा आधीच
ठरली असेल तर या सुटीत आवश्यक दाखले काढून घेण्याची संधी पालकांना असते. परंतु जूनमध्ये प्रवेश सुरु झाल्यानंतरच दाखल्यांसाठी रांगा लागतात. दाखला लवकर हवा असतो. मात्र गर्दीमुळे दाखले मिळण्यास उशीर होतो.
जूनमध्ये एकदमच गर्दी वाढल्याने दाखले वेळेत वेळेत मिळणे मुश्कील होते. मुळात एखादा दाखला काढायचा म्हटले तरी त्यासाठीची भरमसाठ कागदपत्रे काढताना नाकीनऊ येते. त्यामध्ये जातीचा दाखला काढण्याची किचकट प्रक्रिया वेळखाऊ आहे. यामुळे दाखले वेळेत काढून ठेवणे गरजेचे असते.
अनेकवेळा यंत्रणेला दोष
दाखले काढून ठेवण्याचे नियोजन अनेक पालक करीत नाही. त्यानंतर अगदी वेळेवर दाखले काढण्यासाठी जातात. मात्र त्यांना ते वेळेत मिळत नाही. त्यानंतर मात्र प्रशासकीय यंत्रणेलाच दोष दिला जातो.
या दाखल्यांची गरज
दहावी, बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी डोमेसाईल, उत्पन्न दाखला, नॉन
क्रिमिलिअर, आरक्षण नसलेल्या जातीसाठी ईडब्ल्यूएस, कुणबी नोंद असलेल्यांना ओबीसी, कुणबी नोंद नसणाच्यांसाठी नव्याने एसईबीसी दाखला, शेतकरी दाखला, अल्पभूधारक आदी दाखल्यांची गरज असते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव कसरत करावी लागते.






