संकटात पिकांचे रक्षण : विमा रकमेचा होणार शासनाकडून भरणा
विविध नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. बरेचदा अशा आपत्तीमुळे हातचे पीक गमवावे लागते. अशावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविली जात आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येते. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांकरिता खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यात येते.
अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिकांची लागवड करणारे सर्व कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी पीक विम्याचा लाभ घेऊ शकतात. शेतकऱ्यांसाठी नाव नोंदणी ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. अधिसूचित पिके आणि शेवटच्या तारखेची माहिती जनसुविधा केंद्र, पीएमएफबीवाय संकेतस्थळ, विमा कंपनी किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपलब्ध होते. कर्जदार शेतकरी नोंदणीच्या शेवटच्या तारखेच्या किमान ७ दिवस अगोदरपर्यंत बँकेमध्ये सहभाग न घेण्याविषयी अर्ज करून किंवा स्व- घोषणापत्र जमा करून योजनेतून बाहेर पडू शकतात.
अधिसूचित अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी खरिपाकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के, रब्बी पिकांसाठी १.५ टक्के आणि नकदी पिके, फळपिके यांना विमा संरक्षित रकमेच्या जास्तीत जास्त ५ टक्के विमा हप्ता दर होता. सर्वसमावेशक पीक विमा योजनेंतर्गत शेतकरी हिस्स्याचा भार शेतकऱ्यांवर न ठेवता विमा हप्ता रक्कम या वर्षापासून राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे.
या योजनेंतर्गत जोखमीच्या बाबी निश्चित करण्यात आल्या आहे. त्यात हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी बाबींमुळे सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम अनुज्ञेय होते. या जोखिमेस पीक काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंतच विमा संरक्षण देय असते.
स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या बाबींमध्ये विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देय होते. जोखिमेचा संरक्षण लाभ मिळण्यासाठी घटना घडताच ७२ तासाच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई बाबींमध्ये शेतात पिकांची कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेली अधिसूचित पिके कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत गारपीट, वादळ, चक्रीवादळ वा अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येते. या नुकसानीची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. या योजनेत सहभागी होऊ इच्छिणारे पात्र शेतकरी जवळची बँक शाखा, सहकारी सोसायटी, जनसुविधा केंद्र, विमा कंपनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीला संपर्क साधून सहभागी होऊ शकतात. योजनेत सहभागासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्याने जमीन मालकी दस्तऐवज ७/१२, ८-अ, आधारकार्ड, बँक पासबुक, राज्य अधिसूचनेत अनिवार्य असल्यास पीक पेरणी प्रमाणपत्र कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
नुकसानीची माहिती वेळेत देणे आवश्यक
■ स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित विमाधारक शेतकऱ्याने घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीला पीक विमा अॅप, टोल फ्री क्रमांकावर पूर्वसूचना किंवा बँक, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यां- मार्फत लेखी सूचना देणे आवश्यक आहे. पूर्वसूचनेत शेतकऱ्याचे नाव, मोबाइल क्रमांक, महसूल मंडळ, बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, आपत्तीचा प्रकार, बाधित पिके नमूद असावी. योजनेची सविस्तर माहिती १८०० १८० १५५१ यावर किंवा कृषी विभाग, जनसुविधा केंद्र, विमा एजंट यांच्याकडे शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकते.
Home आपला जिल्हा Breaking News प्रधानमंत्री पीक विमा@ केवळ एक रुपयात विम्याचा लाभ@७/१२, ८-अ, आधारकार्ड, बँक पासबुक,






