फुले-आंबेडकर यांचे विचार देशाच्या एक्यासाठी प्रेरक – डाँ. राजरत्न आंबेडकर
महात्मा ज्योतीबा फुले आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी असुन आदर्श समाज निर्मीती सोबतचं देशाच्या एक्यासाठी प्रेरक आहेत, त्यामूळे सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या प्रत्येकाने त्यांच्या विचाराचे अनुकरण करावे. असे आवाहन बुध्दीष्ट सोसायटी आँफ इंडीयाचे डाँ. राजरत्न आंबेडकर यांनी केले.
मूल तालुक्यातील चकदुगाळा येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी डाँ. राजरत्न आंबेडकर बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुषमा गंधारे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास सुप्रसिध्द चर्मरोग तज्ञ डाँ. विनोद माहोरकर, प्रा. कोमल खोब्रागडे, प्रा. विलास बांबोळे, डाँ. रोशन दुर्गे, सरपंच गोविंदराव वनकर आदी उपस्थित होते.

मान्यवरांच्या मनोगतानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. सुषमा गंधारे यांनी कोणाकडूनही देणगी, वर्गणी किंवा अनुदानाची मागणी न करता दोन्ही महामानवांचे विचार पुतळ्याच्या माध्यमातुन सदैव स्मरणात राहो आणि त्यांनी दाखविल्या मार्गाने जाण्याची ऊर्जा प्राप्त होवो. या उद्देशाने चकदुगाळा येथील बौध्द समाजाने गांवातील बौध्द कुटूंबाकडून वर्गणी गोळा करून भव्य पुतळा आणि दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करावे. ही बाब प्रशसंनिय असुन याचे अनुकरण व्हावे. अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डाँ. राजरत्न आंबेडकर आणि प्रा. सुषमा गंधारे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयभिम सार्वजनिक बौध्द समाज समितीचे अध्यक्ष डाँ. वशिष्ठ वाकडे यांनी केले. संचलन कैलास वाकडे यांनी तर पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष भुपेश दुर्गे यांनी आभार मानले. संध्याकाळी सप्तखंजेरी वादक तुषार सुर्यवंशी आणि संचाचा समाज प्रबोधनपर कार्यक्रम पार पडला. दोन्ही कार्यक्रमाला स्थानिक व परीसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोशन वाळके, गौरव खोब्रागडे, राहुल मानकर, दिनेश वनकर, संदेश खोब्रागडे, बंडु वाकडे, जगन्नाथ गेडाम, राजकुमार खोब्रागडे रमाई महीला मंडळाच्या अध्यक्षा छबुताई वनकर आणि सचिव करूणा दुर्गे यांनी परीश्रम घेतले.







