चंद्रपूर दि. 27 एप्रिल : कोरोना संकटाच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीत रुग्णांना उत्तमोत्तम आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सीजन बेड, व्हेंटिलेटर बेड, तसेच वैद्यकीय सेवा देणाऱ्या उपाययोजना तातडीने करून घ्याव्यात. तसेच वैद्यकीय रूग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांना वैद्यकीय सुविधेचा लाभ लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार सुरेश धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मनपा आयुक्त राजेश मोहिते, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
डाॅक्टर, आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता उत्तम आरोग्य सेवा देण्याच्या दिशेने प्रामाणीक प्रयत्न करत आहे. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. नागरिकांनी लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, शासनाने घालून दिलेले नियम पाळावे. जेणेकरून कोरोनाचा प्रसार थांबविण्यास मदत मिळेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख म्हणाले.
विजय वडेट्टीवार :
दिवसेंदिवस बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत आहेत. त्यामुळे खाटांची संख्या देखील वाढवावी लागत आहे. त्यातच रुग्णांना विहित वेळेत ऑक्सिजन मिळावा त्यासाठी स्त्री रुग्णालयात 20 केएल क्षमतेचे ऑक्सीजन टॅंक उभारण्यात आले आहे. त्यातच जिल्ह्यात दैनंदिन आरटीपीसीआर व अँटीजेन चाचण्या वाढविण्यात आल्या असून मोठ्या प्रमाणात बाधित पुढे येत आहे. तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांचा अहवाल प्राप्त होईपर्यंत त्यांना होम आयसोलेशन मध्ये ठेवण्यात यावे जेणेकरून या रोगाचा प्रसार इतरत्र होणार नाही. अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्या.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने वरील ताण कमी करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 50 ऑक्सिजन बेड वाढविण्याचे कार्य सुरू केले आहे. त्यासोबतच ग्रामीण भागात 400 बेड वाढवून देण्याची कार्यवाही केलेली आहे.
तसेच जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत होता तो भरून काढण्यासाठी 1,500 रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
यावेळी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य समस्या तातडीने सोडविण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना विनंती केली.
वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी चंद्रपूर जिल्ह्यात निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीला भेट देत सदर इमारतीच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी केली. विद्यार्थ्यांना जिल्ह्यातच वैद्यकीय शिक्षण घेता यावे तसेच नागरिकांना आरोग्य सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी उत्तम दर्जाची इमारत उभारण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळावा तसेच जिल्ह्यातील व बाहेरून येणाऱ्या नागरिकांना उपचाराकरिता या वैद्यकीय महाविद्यालयाचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. यामुळे दुर्धर व मोठे आजाराचे उपचार करणे सोयीचे होणार आहेत असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अग्रगण्य असे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींचे वसतीगृह, अग्निसुरक्षा व्यवस्थेची परिपूर्ण माहिती प्रोजेक्ट इन्चार्ज विनोद कुमार यांनी चित्रफितीच्या माध्यमातून सादर केली.
स्त्री रुग्णालयाला भेट देत प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची श्री अमित देशमुख यांनी पाहणी करून माहिती घेतली.तसेच मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवक घ्यावे अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी प्रशासनाला दिल्या.