मूल तालुक्यात कोरोना लसीचा तुटवडा

28

लस उपलब्ध होताच लसीकरण पूर्ववत

एसडीओंचे आश्वासन

मूल : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरणाचा आजपर्यत ६८३८ नागरिकांनी लाभ घेतला आहे. लसींच्या तुटवड्यामुळे तालुक्यातील लसीकरण सध्यास्थितीत बंद करण्यात आले असून लस उपलब्ध होताच लसीकरण पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.

जनतेची मागणी व अडचण लक्षात घेवून प्रशासनाने मूल तालुक्यात पाच तर सावली तालुक्यात सात ठिकाणी कोरोना लसीकरण केद्र सुरू केले आहे. मूल तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या पाच पैकी उपजिल्हा रूग्णालय मूल, प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा, चिरोली, राजोली आणि बेंबाळ या ठिकाणी तर सावली तालुक्यात ग्रामीण रूग्णालय सावली याशिवाय बोथली, पाथरी, अंतरगांव, सामदा, हरांबा आणि खेडी या सात ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ३५४५, मारोडा ११८२, चिरोली ११३५, अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या राजोली येथे ४८२ आणि बेंबाळ येथे ४९४ असे एकुण ६७९८ जणांचे लसीकरण झाले आहे. सध्यास्थितीत मूल तालुक्यातील पाचही केंद्रावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे, सावली तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय सावली येथे २६९८ जणांनी तर बोथली- १३१४, पाथरी-१०९४, अंतरगांव- १२०७, सामदा- ३९२, हरांबा- ४५० आणि खेडी येथे ३४३ असे एकुण ७४९८ व्यक्तींनी लस टोचली आहे. सध्यास्थितीत मूल तालुक्यात कोरोना रूग्ण असलेल्या ८१ जणांपैकी ४३ रूग्ण गृह अलगीकरणात तर ३८ रूग्ण संस्थात्मक अलगीकरणात आहेत तर सावली तालुक्यात निष्पन्न झालेल्या ५१ कोरोना रूग्णांपैकी ३३ जण गृहअलगीकरणात आणि २९ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

     मूल तालुक्यात आजपर्यत ८५६४ व्यक्तींनी आरटीपीसीआर तर ४०६५ जणांनी अँटीजन असे एकुण १२६२९ तर सावली तालुक्यात ५०२० व्यक्तींनी आरटीपीसीआर व ४३५२ जणांनी अँटीजन असे एकुण ९३७२ व्यक्तींनी कोरोना रोगाची तपासणी केली असल्याची माहीती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी दिली.

     उपविभागात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी मूल तालुक्यात तहसीलदार डॉ. रविंद्र होळी आणि सावली तालुक्यात तहसीलदार परीक्षीत पाटील यांच्या नेतृत्वात संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगताना महादेव खेडकर यांनी संभाव्य धोका लक्षात घेवून सर्वच स्तरातील नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.

मूल येथील वार्ड नं. ८ मधील रामलिला सभागृह परिसरात कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याने नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने तो परिसर प्रशासनाने मायक्रो कन्टेन्टमेंट झोन जाहीर केला आहे.