Home आपला जिल्हा उद्घाटनापूर्वीच वापरण्यात येत असलेल्या मूल येथील बस स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे,...

उद्घाटनापूर्वीच वापरण्यात येत असलेल्या मूल येथील बस स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत

110

 

मूल : कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या येथील प्रशस्त व भव्य बस स्थानकाचे काम मागील कित्येक महिण्यांपासून बंद आहे. काम पूर्ण होण्याची मुदत पूर्ण होऊनही अनेक काम अपूर्ण असून आवश्यक सोयींच्या अभाव असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उद्घाटनापूर्वीच वापरण्यात येत असलेल्या येथील बस स्थानकाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यानी केली आहे.

     राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांना पाठविलेल्या निवेदनात संतोष रावत यांनी येथील बस स्थानक चंद्रपूर, गडचिरोली, ब्रह्मपुरी, चिमूर, गोंडपिपरी या मार्गावर केंद्रस्थानी आहे. महामार्गावर असलेल्या या स्थानकावरून धावणाऱ्या दीडशेच्या वर बस फेऱ्यांमधून दररोज हजारो प्रवासी ये.जा करीत असतात. सदैव वर्दळीचे आणि मध्यवर्ती ठिकाणी असलेले येथील बस स्थानक प्रवाशांना सर्व सोयींचे व्हावे, या उद्देशाने तत्कालीन शासनाने जुने बस स्थानक निर्लेखित करून नव्या व भव्य दिव्य बस स्थानकाचे बांधकाम करण्याचे ठरविले. कोट्यवधी रूपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या येथील बस स्थानकाचा मोठा गाजावाजा करून भूमीपूजन पार पडले. त्यामुळे त्याच गाजावाजात बस स्थानकाचे काम पूर्ण होऊन उद्घाटन होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, सदर बस स्थानकाचे काम पूर्ण करण्याची मुदत पूर्ण होऊनही आज कित्येक महिने लोटून गेले तरीही बसस्थानकाचे काम पूर्ण झालेले नाही. एस.टी.बस उभी ठेवण्यासाठी जागेची गरज, प्रवाशांची अडचण आणि मागणी लक्षात घेऊन परिवहन विभागाने अपूर्णावस्थेत असलेल्या सदर बस स्थानकाचा वापर सुरू केलेला आहे. वापरण्यात येत असलेल्या अपूर्णावस्थेतील येथील

बस स्थानकावर अनेक समस्या 

बसण्याकरिता खुच्र्याची व्यवस्था नसल्याने प्रवासी निवाऱ्यामध्ये प्रवाशांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

स्थानकावरील प्रवाशांची गर्दी लक्षात न घेता स्थानकावर शौचालय व्यवस्था करण्यांत न आल्याने अनेक प्रवाशी उघड्यावरच गरज भागवित असतात.

शौचालयात मुबलक पाणी नसून पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा अभाव आहे.

पंख्याअभावी डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणांत आहे.

बस स्थानकावर उभारलेला तंबू नियोजनबध्द उभारण्यात न आल्याने पावसाळ्यात तंबुवरील पाणी प्रवाशी उभे राहतात त्याठिकाणीच पडते.

स्थानकावर नियुक्त कर्मचाऱ्यांना बसण्याकरीता बांधण्यात आलेल्या खोल्यांमध्ये विद्युत व्यवस्था नाही, पुरेसे साधन सामुग्रीही नाही, त्यामुळे प्रवाश्यांसोबतच कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानक भव्य दिव्य आणि प्रशस्त जागेत असले तरी अनेक सोयींअभावी गैरसोयीचे झाले आहे. त्यामुळे सदर स्थानकाची वरिष्ठांमार्फत पाहणी व चैकशी करून आवश्यक सोयींची पूर्तता करावी व येथील बस स्थानक शक्य तितक्या लवकर प्रवाशांना सेवेसाठी अधिकृतरित्या हस्तांतर करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.