नगर प्रशासनाने पर्यावरणाची गरज आणि पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शहरात योजना अंमलात आणावी

28

मूल : शहर स्वच्छतेसोबतच नगर प्रशासनाने पर्यावरणाची गरज आणि पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन शहरात योजना अंमलात आणावी यासाठी संस्थेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या मूल येथील महिलांनी नगर प्रशासनाला दिले आहे.

शासन वृक्षारोपणासोबतच वृक्ष संवर्धनासाठी कार्यरत आहे. परंतु, पाण्याचे महत्त्व ओळखून पाण्याच्या बचतीसाठी मात्र प्रशासनासोबतच सामान्य नागरिकही पाहिजे त्या प्रमाणात सक्रीय नाही. ही बाब गंभीर असून येत्या काळात पर्यावरणासोबतचपाण्याची भीषणता जनतेला भेडसावणार असल्याने नागरिकांसोबतच प्रशासनाला पाणी अडवा, पाणी जिरवा, ही योजना राबविणे गरजेचे झाले आहे. नगर परिषद प्रशासनाने मूल शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या कल्पनेवर योजना कार्यान्वीत करून नागरिकांना पाण्याच्या बचतीचे आवाहन करावे. यासाठी आमची संस्था नगर प्रशासनाला अपेक्षित असलेले सहकार्य करू, असे आश्वासन नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेच्या विभागीय उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ललिता मुस्कावार, जिल्हा सचिव रत्ना चौधरी यांच्यासह महिलांनी दिले. यावेळी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर आणि मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी पाण्याच्या विषयावर काम करीत असल्याबद्दल कौतुक केले.