रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

49
रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
चंद्रपूर, दि. 19 मार्च : चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरण करण्याबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली रामाळा तलाव परीसर येथे काल आढावा सभा घेण्यात आली. रामाळा तलावाबाबत सी.एस.आर. प्रमुखाची लवकरच बैठक तात्काळ घेण्यात येईल तसेच खनिज निधी मधुन तलावाच्या कामासाठी निधी मिळविण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.
सभेला अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, महानगर पालिका आयुक्त राजेश मोहिते, चंद्रपूर शहर चंद्रपूर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, चंद्रपूर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे, इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे प्रामुख्याने उपस्थित होते.
महानगरपालिकेतर्फे रामाळा तलाव स्वच्छतेबाबत एस.टी.पी बसविणे व रिटेनिंग वाल बसविण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. तसेच जलनगर येथुन येणाऱ्या नाल्यावर तात्काळ उपाययोजना करणेच्या दृष्टीने दहा दिवसात प्रस्ताव तयार करण्यात येईल असे महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते यांनी सांगितले. तर वेकोली चंद्रपूर कडुन वेकोलीचे पाणी रामाळा तलावात सोडण्याबाबत पाईपलाईनचे काम झाले असुन पाणी तपासणीबाबत प्रदुषण मंडळांना पाण्याचा नमुना दिला असल्याचे वेकोलीचे अधिकारी यांनी सांगितले. वेकोलि कडुन पाणी तलावात सोडण्याबाबत पाण्याचा नमुना प्राप्त झाला असुन सदर पाणी जलचरासाठी योग्य आहे किंवा नाही याबाबत दोन दिवसात तपासणी अहवाल अहवाल येणार असल्याचे प्रदुषण विभागाचे अधिकारी यांनी सांगितले.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्याम काळे यांनी रु. 528 लक्षाचा गाळ काढण्याचा प्रस्ताव शासनास पाठविला असल्याचे सांगून प्रस्तावास शासनाकडुन मान्यता मिळाल्यास तात्काळ कामे सुरु करता येईल असे सांगितले.
तलावातील कामे दिनांक 15 जुन 2021 पर्यंत सुरु होणे आवश्यक आहे असे श्री बंडु धोतरे अध्यक्ष इको प्रो संस्था यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन पादचारी पुलाचा रु. 11 कोटीचा प्रस्ताव सादर केलेला असुन अद्याप या प्रस्तावाला मान्यता मिळाली नसल्याचे उपकार्यकारी अभियंता एस. डी. मेंडे यांनी सांगितले.
यावेळी वेकोलि चे अधिकारी, रेल्वे स्टेशन मास्टर श्री. मुर्ती, प्रदुषण मंडळचे अधिकारी, वरिष्ठ भुवैज्ञानिक श्रीमती चव्हान व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.