मुंबई – १४ मार्च रोजी होणार असलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज जाहीर केला होता. या परीक्षा पुन्हा एकदा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.
या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यसेवा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याचे चित्र देखील राज्यातील अनेक शहरांमध्ये पाहायला मिळाले. अशातच विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.
यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना सतावत असलेल्या, ‘परीक्षा नेमक्या किती दिवस पुढे ढकलल्या जाणार?’ या प्रश्नाचे उत्तर दिले. ‘राज्यसेवेच्या परीक्षांची तारीख उद्या जाहीर करण्यात येणार असून ही तारीख येत्या ८ दिवसांच्या आतील असेल, हे माझे वचन आहे’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केलं.