जिल्ह्यात चित्ररथांद्वारे कोरोनाविषयक जनजागृतीसाठी मोहीम
चंद्रपूर, दि. 10 मार्च : जिल्ह्यात कोरोनाविषयक प्रभावी जनजागृतीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने व अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी आज हिरवी झेंडी दाखविली.
जिल्ह्याच्या विविध भागात फिरणाऱ्या या चित्ररथामध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, कोरोना लसीकरण आदींच्या चित्रफिती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या डिजिटल चित्ररथाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृती व सुरक्षित कोविड लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांच्या संकल्पनेतून या प्रचार अभियानाची सुरुवात झाली आहे.
डिजिटल चित्ररथासोबत योजनांची माहिती देणारे प्रचार साहित्य देखील वितरित केले जाणार आहे. आज या अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी यांनी फित कापून केले.