Gadge Maharaj Jayanti: देवकी नंदन गोपाला… समाजाला स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगे महाराजांची जयंती

109

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देणारे थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगे महाराज (Sant Gadge Maharaj) यांची आज जयंती. गाडगे महाराजांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील अंजनगावात झाला. गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप.

गाडगे महाराज यांचे बालपण मुर्तिजापुर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामांच्या गावी गेले. पुढे बारा वर्षे गाडगे महाराजांनी अज्ञातवासात काढली. गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगू लागले. गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले.

 

संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण

गाडगे महाराज चालते फिरते सामाजिक शिक्षक होते. संपूर्ण महाराष्ट्रात ते फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व लोकांना पटवून दिले. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत असत.

समाजसुधारक गाडगे महाराज

दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करत त्यांनी माणसातील अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून दिली. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका, असे ते नेहमी सांगत असत.

 

देव दगडात नाही, माणसात आहे

देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. गाडगे महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत असत. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा, प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा नेहमी उपयोग करत असत.

गाडगे महाराज समतेचे पुरस्कर्ते

सामान्य लोकांसाठी गाडगे महाराजांनी अपार कार्य आणि कष्ट केले. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. जनकल्याणाची अनेक कामे केली. गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे अनेक धर्मशाळा बांधल्या. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.