माझी अंगणवाडी : माझी आनंदवाडी’
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाचा उपक्रम
52 भागात आकाशवाणीवरून प्रसारीत होणार
चंद्रपूर, दि.12 फेब्रुवारी : महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबतची माहिती देणारा ‘माझी अंगणवाडी माझी आनंदवाडी’ हा लोकप्रिय आकाशवाणी कार्यक्रम 13 फेब्रुवारी पासून दर शनिवारी सकाळी 9.30 ते 10.00 या कालावधीत 52 भागात आकाशवाणी केंद्र, चंद्रपूर (103.00 MHz F.M.) येथून प्रसारण होणार आहे.
सन 2016-17 ते सन 2018-19 या कालावधीमध्ये माझी अंगणवाडी माझी आनंदवाडी कार्यक्रमाचे नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरुन कार्यक्रमाचे 52 भागात प्रसारण करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे दि. 13 फेब्रुवारी 2021 ते 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत प्रसारण करण्यात येणार आहे. तरी संबधित सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी व प्रकल्पातील पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांनी आठवड्यातील दर शनिवारी सकाळी 9.30 ते 10.00 या वेळात सन 2016-17 मध्ये अंगणवाडी केंद्रांना वाटप करण्यात आलेल्या ट्रान्झीस्टर च्या माध्यमातून तसेच अंगणवाडी केंद्रांना देण्यात आलेल्या मोबाईल द्वारे “माझी अंगणवाडी माझी आनंदवाडी” कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामीण भागामध्ये सदर कार्यक्रमाविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करुन महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेणेस्तव माहिती द्यावी, असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) संग्राम शिंदे यांनी कळविले आहे.