क्रांतिज्योती सावित्रीआई फुले म्हणजे स्त्रीशक्तिचे निर्भीड ऊर्जास्त्रोत! – सौ. संध्या गुरनुले.

49

क्रांतिज्योती सावित्रीआई फुले म्हणजे स्त्रीशक्तिचे निर्भीड ऊर्जास्त्रोत! – सौ. संध्या गुरनुले.
____________

माळी समाज मुल यांचेवतीने कन्नमवार सभागृहात सावित्रीआई फुले जयंती व महिला शिक्षण दिन साजरा.

रविवार, दि. ०३ जानेवारी.
अखिल भारतीय माळी समाज मुल यांचेवतीने आज स्थानिक कन्नमवार सभागृहात सावित्रीआई फुले जयंती व महिला शिक्षण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून उपस्थितांना संबोधित करताना, क्रांतिज्योती सावित्रीआई फुले म्हणजे स्त्रीशक्तीचे निर्भीड ऊर्जास्त्रोत होय. आज जग झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे नव्यानव्या क्षेत्रात, प्रशासनातील उच्च पदांवर स्त्रियांनी आणि विशेषतः माळी समाजबांधवानी आपले नाव कोरण्याची गरज आहे. क्रांतिसुर्य जोतिरावांनी शिक्षणाच्या मूलमंत्राबरोबरचं शेकडो वर्षे विकासापासून कोसो दूर राहिलेल्या बहुजनांच्या उत्थानासाठी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या विचारांवर माय सावित्री घडली. सावित्री स्वत: शिकली आणि पुढे पुण्यातून शिक्षणाचा पाया रोवण्याचे मानवतावादी कार्य त्यांनी सिद्धीस नेले.

स्त्रियांबद्दल चालत आलेली पूर्वापार जुनाट संकल्पना चुल आणि मुल त्यांनी मोडीत काढली. स्त्रियांना सन्मानाचे जीवन जगता यावे म्हणून ज्योती-सावित्री आयुष्यभर झिजले आणि शेकडो वर्षांची गुलामी, दुय्यमत्व, केशवपन, बालविवाह अशा कुप्रथांना तिलांजली देण्याचे काम स्त्रीशिक्षणाच्या माध्यमातुन फुले दाम्पत्यानी केले.
परंतू आज आपण पाहतो, फुल्यांना आपला मानणारा माझा माळी समाज पाहिजे त्या गतीने प्रगती करताना दिसत नाही. समाजातील बहुसंख्य भाग हा शैक्षणिक क्षेत्राकडे दुर्लक्ष करतांना दिसतो आहे. त्यामुळे आपल्या समाजात आर्थिक हालअपेष्टा, राजकिय ऊदासिनता, आणि युवकांमध्ये घातक अशी व्यसनाधीनता बघायला मिळते. हे चित्र अतिशय भयावह आहे. म्हणून आज आपल्याला माळी समाजाचा एक घटक म्हणून, फुल्यांच्या सत्यशोधक विचारांचा अनुयायी म्हणून समाजातील प्रत्येक उपेक्षित, दिनदलित बांधवाना प्रगतीच्या दिशेने घेवून जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे मत सौ. संध्या गुरनुले यांनी प्रतिपादित केले.

पुढे बोलतांना, आज खर्‍या अर्थाने युवतींनाही सावित्रीने अंगीकारलेल्या धाडसाची गरज आहे. हल्ली आपण पाहतो की देशात महिला अत्याचाराचे, अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत स्त्रीने मॉडर्न होता होता गतकाळात सावित्रीने ज्या प्रकारे स्त्री शिक्षण म्हणजे पाप असे गैरसमज पसरवून त्यासाठी विरोध करणार्‍या गावगुंडाशी, समाज विघातक प्रवृत्तींशी त्यांचे दगड-धोंडे, शिव्याशाप झेलून यशस्वी लढा दिला. त्याप्रकारे आज आपल्याला समाजात सावित्री बनून वावरण्याची गरज आहे. असेही त्या म्हणाल्या.

यावेळी मंचावर, माजी नगराध्यक्षा सौ. उषाताई शेंडे, माजी उपनगराध्यक्षा सौ. रत्नमाला ठाकरे, नगरसेविका शांताबाई मांदाळे, बहीनाबाई वाढई, वर्षाताई चौधरी, मीराताई शेंडे, सीमाताई लोनबले, रत्नाताई चौधरी, माळी महासंघाचे राज्य अध्यक्ष अरूणजी तिखे, विहींपचे गहलोत, प्रा. रामभाऊ महाडोळे, प्रा. विजय लोनबले, गुरू गुरनुले, प्रविण मोहुर्ले आदींसह शहरातील माळी समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते.