मोठी बातमी : राज्यात शिक्षकांची होणार पवित्र पोर्टलद्वारे भरती

54

मोठी बातमी : राज्यात शिक्षकांची होणार पवित्र पोर्टलद्वारे भरती

मुंबई : माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या कार्यकाळात राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या वर्गातील शिक्षकांची 12 हजार 400 पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यापैकी सहा हजार पदांची भरती पूर्ण झाली. उर्वरित पदभरतीवर वित्त विभागाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आर्थिक परिस्थितीचे कारण देत बंदी घातली होती. मात्र आता ती भरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार या पदभरतीवरील बंदी उठविली. त्यानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीद्वारे सुरु असलेली शिक्षणसेवक पदभरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने 12 हजार 140 पदांची शिक्षक भरती केली जाहीर होती. भरती होणाऱ्या एकूण पदांपैकी सहा हजार पदांच्या भरतीस वित्त विभागाने परवानगी दिली असून वित्त विभागाने शिक्षक पदभरतीवरील बंदी उठविली आहे. त्यामुळे आता उर्वरित पदांची भरती पवित्र पोर्टलवरुन होणार आहे.

शिक्षणसेवकांच्या मानधन वाढीचा निर्णय नाहीच
पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गावर शिकविणाऱ्या शिक्षकांना दरमहा सहा हजार रुपयांवर सलग तीन वर्षे काम करावे लागत आहे. तर नववी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांना नऊ हजारांचे मानधन दिले जाते. वाढत्या महागाईच्या काळात तेवढ्या रकमेवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही भागू शकत नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शिक्षणसेवक पद रद्द करा अथवा मानधनवाढीची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. मात्र, त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नसून शिक्षण आयुक्‍तांचा प्रस्तव वित्त विभागाकडे तसाच पडून आहे.