माजी सैनिक कुटुंबियांकरिता उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

32
माजी सैनिक कुटुंबियांकरिता उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम
चंद्रपूर दि.23 नोव्हेंबर: कोरोनाच्या महामारीत अनेक ठीकाणी रोजगाराचे संकट निर्माण झाल्यामुळे कौटुंबिक आर्थिक रचना मजबूत करण्याची गरज आहे. यासाठी माजी सैनिक, विधवा पत्नी तसेच पाल्य यांच्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत रोजगार स्वयंरोजगाराच्या विविध योजना राबवित आहेत. यादृष्टीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी मार्फत सन 2020-21 मध्ये कोरोना लॉकडाऊन स्थितीमुळे घरबसल्या उद्योग विषयक मार्गदर्शन व ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणाचा कालावधी पाच दिवसाचा असून दररोज तीन तास अनिवासी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम असणार आहे. कमाल 40 उमेदवारांची एक बॅच असून वयाची अट 18 ते 50 वर्षे आहे.प्रशिक्षण शुल्क 350 रुपये प्रतिदिन प्रती प्रशिक्षणार्थी असेल. प्रशिक्षणासाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कडून करण्यात येईल.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये उद्योजकता व्यक्तिमत्व, उद्योजकीय गुण व त्यांचा विकास, उद्योजक संज्ञा व त्यांचे प्रकार, उद्योगासाठी मार्केटिंग व मार्केट सर्वे, प्राथमिक प्रकल्प अहवाल तसेच माजी सैनिकांसाठी असलेल्या उद्योग कर्ज योजनांबाबतच्या अभ्यासक्रमाचा समावेश असेल.
ऑनलाइन प्रशिक्षणासाठी इच्छुक माजी सैनिक, विधवा पत्नी तसेच पाल्यांनी दिनांक 2 डिसेंबर 2020 पर्यंत आपले नाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.