महिलांनी कल्याणकारी कायद्याबाबत जागरूक राहणे आवश्यक विधी सेवा प्राधिकरणद्वारे आयोजित कार्यक्रमात ॲड. आम्रपाली लोखंडे यांचे मत

41
महिलांनी कल्याणकारी कायद्याबाबत जागरूक राहणे आवश्यक
विधी सेवा प्राधिकरणद्वारे आयोजित कार्यक्रमात ॲड. आम्रपाली लोखंडे यांचे मत
चंद्रपूर दि. 23 नोव्हेंबर : महिलांनी विविध कल्याणकारी कायद्यांची माहिती घेऊन त्याबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे, असे मत ॲड.आम्रपाली लोखंडे यांनी महिलांसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिएशन हॉल, तालुका विधी सेवा समिती, दिवाणी व फौजदारी न्यायालय, राजुरा येथे नुकताच सदर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी मुकुल कल्याणकर होते.
ॲड.आम्रपाली लोखंडे यांनी यावेळी महिलांना कौटुंबिक कायदे, महिलांविषयक लागू पडणारे दिवाणी व फौजदारी कायदे, कामगार कायदे, महिला आरोग्य विषयक कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कायदेशीर तरतुदींना अनुसरून आपल्या कायदेशीर हक्काबाबत दाद मागण्यासाठीची कार्यपद्धती सोप्या भाषेत समजावून सांगितली. सर्व महिलांना तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेकडून पूर्णपणे मोफत सेवा दिली जाते हेसुद्धा त्यांनी नमूद केले. कायदेशीर मदत व माहिती मिळण्यासाठी हेल्पलाईन तसेच वन स्टॉप सेंटर स्वाधार केंद्र यांची सुद्धा सुविधा उपलब्ध असल्याचे तसेच प्रकरण दाखल, पूर्व कौटुंबिक विवाद, मध्यस्थी समुपदेशन केंद्र याबाबत सुद्धा माहिती दिली व त्याचे लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचलन अजय गोंगले तर आभार प्रदर्शन पि.व्हि. वाढई यांनी केले. यावेळी राजुरा येथील महिला वर्ग तसेच न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.