विद्यार्थी विक्रेते तर ग्रामस्थ बनले ग्राहक
मूल: कुणी ओरडतोय ‘गरमा गरम भजे घ्या भजे’ तर कुणी रसदार गुलाब जामुन लेलो म्हणत ग्राहकांना लडिवाळ साद घालतोय, कुणी लज्जतदार गोलगप्पे गुपचुप विकतो, तर कुणी मसाला भात पर मठ्ठा फ्री ची ऑफर देत आपल्या उत्पादनाची अफलातून जाहिरात करतोय.
गावकरीही या मुलांनी भरविलेल्या अनोख्या
खाद्यबाजारात ग्राहक बनून क्षणभर हरवून जातात. प्रसंग होता जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोंडाळा बु. ने शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या आनंद मेळाव्याचा. शालेय विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन कौशल्य शिकता यावे. त्याचबरोबर उत्पादित माल बाजारपेठेत विकण्यासाठी
आवश्यक असणारे विक्री कौशल्य आत्मसात करता यावे. या उद्देशाने प्रत्यक्ष बाजारच शाळेने आपल्या प्रांगणात भरविला. त्यात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने विविध खाद्यपदार्थ बनवून बाजारात विक्रीसाठी ठेवले. ग्राहक होते सर्व गावकरी आणि
विद्यार्थीही. उत्पादित मालाचे जाहिरात फलक व त्यांची टॅग लाईन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होते. मिरची भजे, न्यूडल्स, समोसे, आलू पोहे, आलूभजे, उपमा, वडा, पुरुभाजी, गुलाबजामून, अप्पे, गुपचुप, कोबीवडे, ब्रेडपकोडे, पास्ता, मसालाभात असे एकाहून एक
अशा लज्जतदार खमंग पदार्थांचा आस्वाद ग्राहक बनून परिसरातील ग्रामस्थांनी घेतला. मालाचे उत्पादन, जाहिरात, विक्री, नफा तोटा याचा प्रत्यक्ष वस्तुपाठच या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाला. मेळाव्याचे उद्घाटन बोंडाळा बुज. चे सरपंच मुर्लीधर चुदरी यांनी केले. व्यावसायिक कौशल्य शिकण्यासाठी अशा कृतिशील उपक्रमांची गरज आहे. अशा शब्दांत त्यांनी शाळेचे कौतुक केले. तर अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाल हे होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बंडूजी पाल, अनिता बोरकुटे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष ज्योत्स्ना झरकर, सदस्य शेषराव वाकुडकर, धनराज नागापुरे, आशा नागापुरे, मुखरू कन्नाके, पपिता चिमुरकर, भाग्यश्री पाल, वंदना येमुर्ले, तसेच प्रज्ञा बोरकुटे, रामपाल, प्रमोद बोरकुटे, शंकर बोरकुटे, जगदीश बांगरे, निलेश यशवंतवार आदी मान्यवर उपस्थित होते. यशस्वितेसाठी शिक्षिका वैशाली महाकारकर, अतुल तिवाडे, रजनी डोंगरे, किरण चुदरी व मुख्याध्यापक किशोर उरकुंडवार यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांना मिळविलेल्या ज्ञानाचे उपयोजन करता यावे. व्यावसायिक मूल्ये त्यांच्यात रुजावेत या हेतूने हे आयोजन करण्यात आले होते. वस्तूंचे उत्पादन ते विक्री याचे व्यवस्थापन व यातील अर्थशास्त्र याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला.
– किशोर उरकुंडवार मुख्याध्यापक






